छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान
नाशिक (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील नागरिकांना महसुली सेवा सुलभ व पारदर्शक पद्धतीने उपलब्ध करून देण्यासाठी मार्च महिन्यापासून मंडळस्तरावर ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान’ राबविण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत नागरिकांना जागेवरच सातबाºयातील (७/१२) ई-फेरफार नोंदणी व दुरुस्तीची सुविधा उपलब्ध होणार असून, विविध महसुली सेवाही तत्काळ प्रदान केल्या जाणार आहेत. राज्य शासनाच्या पारदर्शक, गतिमान आणि लोकाभिमुख प्रशासनाच्या धोरणानुसार मार्च ते मे या तीन महिन्यांच्या कालावधीत प्रत्येक मंडळ स्तरावर शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत. या शिबिरांमधून सातबारा दुरुस्ती, ई-फेरफार नोंदणी, अकृषक तरतुदींविषयी मार्गदर्शन, तसेच सनद न मिळालेल्या मिळकत धारकांना नवीन व्यवस्थेबाबत माहिती देण्यात येईल.
अभियानादरम्यान लोकसेवा हक्क कायद्यांतर्गत येणाऱ्या विविध सेवा देखील नागरिकांना दिल्या जाणार आहेत. उत्पन्नाचा दाखला, रहिवास/अधिवास प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र, नॉन-क्रिमीलेयर अर्ज स्वीकृती, प्रलंबित अर्जांनुसार दाखल्यांचे वितरण याशिवाय विद्यार्थ्यांना शैक्षणिक दाखले वितरित करण्यावरही भर देण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, अपर जिल्हाधिकारी हेमांगी पाटील, सहायक जिल्हाधिकारी तथा नाशिक उपविभागीय अधिकारी अर्पिता ठुबे, निवासी उपजिल्हाधिकारी रोहित राजपूत, उपजिल्हाधिकारी कुंदन हिरे, अपर तहसीलदार अमोल निकम व आबासाहेब तांबे यांनी नागरिकांनी या अभियानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे. महाराजस्व अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली १० सदस्यांची जिल्हास्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे.
या समितीत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, महसूल, कृषी, उपनिबंधक, जलसंधारण, भूमी अभिलेख व वनविभागाचे अधिकारी यांचा समावेश आहे. निवासी उपजिल्हाधिकारी सदस्य सचिव म्हणून काम पाहणार असून, प्रत्येक अधिकाऱ्यावर विशिष्ट जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आल्या आहेत.
नाशिक तालुक्यातील खालील ठिकाणी शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत: दि. ७ व १४ मार्च, दि. १० व १७ एप्रिल राेजी नाशिक, नाशिक-३, पाथर्डी, वडाळा, सातपूर, कामटवाडे, देवळाली, चेहेडी बु. आणि नांदूर दसक. तसेच नगरपालिका व नगरपंचायत क्षेत्रात दि. ८ व १५ मे रोजी कार्यशाळा होणार आहेत. महसुली कामांसाठी वारंवार शासकीय कार्यालयांची पायरी चढावी लागू नये, यासाठीच हे अभियान राबविण्यात येत असून नाशिककरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून याचा लाभ घ्यावा, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.