नाशिक : महाराष्ट्र शासनाच्या अल्पसंख्याक विकास विभागातर्फे ‘हिंद-दी-चादर’ म्हणून ओळखले जाणारे गुरू तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीद शताब्दी समारंभानिमित्त विविध ठिकाणी जनजागृती उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर नाशिक महानगरपालिकेच्या सिडको विभागीय कार्यालयात जनजागृती व प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमास मनपा अधिकारी, कर्मचारी तसेच शीख शिकलकर समाजाचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी गुरू तेग बहादूर साहिबजी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर विभागीय अधिकारी नानासाहेब साळवे यांनी आपल्या मनोगतात गुरू साहेबांच्या कार्याचा आढावा घेतला. त्यांनी सांगितले की, धार्मिक स्वातंत्र्य, मानवतेची जपणूक आणि अन्यायाविरुद्ध लढा या मूल्यांसाठी गुरू तेग बहादूर साहिबजी यांनी दिलेले बलिदान भारतीय इतिहासातील प्रेरणादायी अध्याय आहे. विविध धर्म, पंथ आणि समाजघटकांमध्ये ऐक्य व सौहार्द वाढविण्याची गरज आज अधिक आहे, असेही त्यांनी नमूद केले. यावेळी शीख शिकलकर समाजाच्या प्रतिनिधींनीही आपले विचार मांडले. त्यांनी गुरू साहेबांच्या शिकवणीचे महत्त्व अधोरेखित करत युवकांनी त्यांच्या विचारांपासून प्रेरणा घ्यावी, असे आवाहन केले. मुंबई येथे होणाऱ्या मुख्य शहीद शताब्दी कार्यक्रमास उपस्थित राहून एकात्मतेचा संदेश देण्याचे आवाहनही करण्यात आले. कार्यक्रमादरम्यान गुरू तेग बहादूर साहिबजी यांच्या जीवनकार्यावर आधारित माहितीपर सादरीकरण करण्यात आले. त्यांच्या त्याग, धैर्य आणि राष्ट्रनिष्ठेचे उदाहरण देत समाजात सद्भावना, बंधुता आणि सहिष्णुता वाढविण्याचा संदेश देण्यात आला.
या कार्यक्रमास संजय गांगुर्डे, देव सिंह, चरण सिंग, राजेश सिंग, लाखन सिंग, तकदीर सिंग, रतन सिंह, प्रशांत परब, वैभव झिटे, राहुल तांबोळी, प्रशांत राऊत, प्रणय तेजाळ, गीता लोट, शैलेश काजळे, मंगला चव्हाण आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. कर निरीक्षक राजेंद्र मोरे यांनी सूत्रसंचालन करत कार्यक्रमाची सांगता केली. या जनजागृती उपक्रमामुळे गुरू तेग बहादूर साहिबजी यांच्या शौर्य, त्याग आणि राष्ट्रप्रेमाच्या विचारांचा प्रसार होऊन समाजात राष्ट्रीय एकात्मता अधिक दृढ होईल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.