नाशिकमध्ये अवकाळी पावसाची शक्यता; उष्णतेनंतर हवामानात नाट्यमय बदल!

हवामानातील या बदलामुळे यंदा पावसाळा लवकर सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे, मागील वर्षीदेखील पावसाळ्याने वेळेआधीच हजेरी लावली होती. त्यामुळे यंदाही तसाच कल राहणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शेती क्षेत्रावरही या बदलाचा परिणाम होण्याची शक्यता आहे. अवकाळी पाऊस झाल्यास द्राक्ष, कांदा, भाजीपाला अशा पिकांवर विपरीत परिणाम होऊ शकतो. शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण असून त्यांनी पिकांचे संरक्षण करण्यासाठी उपाययोजना सुरू केल्या आहेत.

दरम्यान, शहरातील महिलांसमोरही एक वेगळेच संकट उभे ठाकले आहे. उन्हाळ्यात पारंपरिक पद्धतीने बनवले जाणारे पापड, शेवया, कुर्डई, वडे यांसारखे वाळवणाचे पदार्थ तयार करण्यासाठी प्रखर उन्हाची आवश्यकता असते. मात्र, वातावरण ढगाळ राहिल्यास किंवा पावसाची शक्यता वाढल्यास हे पदार्थ व्यवस्थित वाळत नाहीत. त्यामुळे वर्षभरासाठी साठवणीचे हे पदार्थ अपुरे राहतील की काय, अशी चिंता महिलांमध्ये व्यक्त होत आहे.

तज्ञांच्या मते, सध्या वातावरणातील आर्द्रता वाढणे, वाऱ्यांची दिशा बदलणे आणि तापमानातील चढ-उतार यामुळे अवकाळी पावसाचे संकेत मिळत आहेत. पुढील काही दिवसांत वातावरण आणखी ढगाळ होऊन हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. नागरिकांनी बदलत्या हवामानाचा विचार करून आरोग्याची काळजी घ्यावी, तसेच शेतकऱ्यांनी पिकांचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *