नाशिक (प्रतिनिधी): शहरातील जय हिंद कॉलनी परिसरात शुक्रवारी रात्री मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवत काही तरुणांनी बेफाम वेगाने वाहन चालवत नागरिकांच्या अंगावर गाडी घालून धुमाकूळ घातल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेत दोन तरुणांसह एका दोन वर्षीय बालिकेला दुखापत झाली असून एका घराचे गेट देखील तोडण्यात आले आहे. या प्रकारामुळे परिसरात काही काळ भीती व तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री उशिराच्या सुमारास (एमएच १५ जेएच ९५८०) क्रमांकाची कार चालक सुनील हरीभाऊ कुमावत हा मद्यधुंद अवस्थेत जय हिंद कॉलनी परिसरातून वेगाने वाहन चालवत होता. गाडीवरील ताबा सुटल्याने त्याने रस्त्यावरून जात असलेल्या सिद्धांत ठाकरे व हर्ष गरूड यांच्या पायावरून गाडी घालत त्यांना जखमी केले. या धडकेत जवळच असलेली दोन वर्षीय बालिका देखील जखमी झाली.
अपघातानंतर कार थेट एका घराच्या गेटवर जाऊन आदळली. त्यामुळे त्या घराच्या गेटचे मोठे नुकसान झाले. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने घटनास्थळी जमा झाले आणि संताप व्यक्त केला.
घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी तत्काळ नगरसेवक शरद फडोळ, दीपक दातीर व प्रतिभा पवार यांना फोन करून घटनास्थळी बोलावून घेतले. त्यांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थितीची पाहणी केली तसेच जखमी नागरिकांना मदत करत पोलिसांना माहिती दिली.
दरम्यान, नागरिकांचा वाढता संताप पाहून गाडीत बसलेल्या दोघा संशयितांनी घटनास्थळावरून पळ काढला. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत एका संशयिताला ताब्यात घेतले असून त्याला वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात नेण्यात आले आहे.
या घटनेमुळे जय हिंद कॉलनी परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा पुढील तपास सुरू केला आहे.