स्मार्ट सिटीच्या अनागोंदी कामामुळे प्रभाग क्र. २८ मध्ये नागरिक त्रस्त; वारंवार जलवाहिनी फुटून लाखो लिटर पाण्याची नासाडी

नाशिक : गेले अनेक दिवसांपासून प्रभाग क्र. २८ मध्ये पाणीटंचाईची समस्या कायम असताना आता स्मार्ट सिटी अंतर्गत सुरू असलेल्या सीसीटीव्ही केबल टाकण्याच्या कामामुळे नागरिकांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे. संबंधित ठेकेदारांकडून कोणतीही सुरक्षितता न बाळगता काम सुरू असल्याने वारंवार जलवाहिनी, गटार लाईन तसेच चेंबर्सचे नुकसान होत असून नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

परिसरातील नागरिकांच्या म्हणण्यानुसार, काम सुरू असताना कोणतेही बॅरिकेड्स किंवा सूचना फलक लावले जात नाहीत. काँक्रीट रस्त्याच्या मधोमध मोठे खड्डे खोदून ते उघडेच ठेवले जात असल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. सोमवारी सकाळी फडोळ मळा परिसरात रस्त्याच्या मध्यभागी मोठा खड्डा उघडा असल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले. याठिकाणी कोणताही सुरक्षेचा उपाय नसल्याने स्थानिक नागरिकांनी स्वतः पुढाकार घेत खड्ड्याभोवती दगड लावून तात्पुरते कुंपण केले. दरम्यान, सोमवारी सायंकाळी पुन्हा एकदा जलवाहिनी फुटल्याने रस्त्यावरून पाण्याचा पाट वाहत होता. या घटनेत लाखो लिटर पिण्याच्या पाण्याची नासाडी झाली. एकदंत नगर व ओम कॉलनी परिसरात गेल्या तीन दिवसांत दुसऱ्यांदा जलवाहिनी फुटल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. या प्रकारामुळे परिसरातील पाणीपुरवठ्यावरही परिणाम झाला.

याच कामादरम्यान रस्त्यावरील गॅस पाइपलाईन फुटून आग लागण्याची घटना घडली होती. दरम्यान, एमजीएनएल अंतर्गत असलेली गॅस पाईप लाईनला सदर परिसरात पहाटेच्यावेळी मोठया प्रमाणत आग लागल्याने मनपा अग्निश्मन विभागा मार्फत प्रयत्न करून एक तासात सदर अगा विझविण्यात आली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी याठिकाणी झाली नाही. नागरिकांनी स्मार्ट सिटीच्या कामांमध्ये योग्य नियोजनाचा अभाव असल्याचा आरोप करत संबंधित ठेकेदारांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. भविष्यात होणारी मोठी घटना टाळण्यासाठी प्रशासनाने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही नागरिकांकडून होत आहे.

“आम्ही सकाळी फडोळ मळा येथील कॉर्नरवरून जात असताना रस्त्याच्या मधोमध मोठा खड्डा दिसला. कोणाचा अपघात होऊ नये म्हणून आम्ही खड्ड्याभोवती दगड लावून कुंपण केले. ज्यांनी हा खड्डा केला त्यांनी नागरिकांच्या सुरक्षिततेचा विचार केला नाही का? रात्रीच्या वेळी येथे मोठा अपघात घडू शकला असता.”
— दिपक घरटे, डि.जी.पी. नगर नं.2, रहिवाशी

“ठेकेदारांकडून अंधाधुंद काम सुरू असून नगरपालिकेच्या पाण्याच्या लाईन्स वारंवार फोडल्या जात आहेत. त्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत स्मार्ट सिटी अधिकाऱ्यांना जाब विचारला जाणार आहे.”
— शरदभाऊ फडोळ, नगरसेवक, प्रभाग क्र.28

“महापालिका प्रशासनाला कोणतीही पूर्वकल्पना न देता स्मार्ट सिटी विभागाने परस्पर काम सुरू केले. याच कामादरम्यान गॅस पाइपलाईन फुटून मोठी आग लागण्याची घटना घडली होती. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.”
— प्रतिभा पवार,  नगरसेविका, प्रभाग क्र.28

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *