नविन नाशिक: प्रभाग क्रमांक 28 मध्ये नगरपालिकेच्या पाणीपुरवठा यंत्रणेतील मेन लाईन लिकेजच्या सतत उद्भवणाऱ्या समस्येमुळे नागरिकांचे हाल होत आहेत. गेल्या काही दिवसांपासून अनेक भागांमध्ये पाण्याचा तीव्र तुटवडा जाणवत असून, काही ठिकाणी पाणी अत्यंत कमी दाबाने येत आहे, तर काही भागांत पाणीपुरवठा पूर्णपणे ठप्प झाल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.
या समस्येमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून, वारंवार मनपा प्रशासन व स्थानिक लोकप्रतिनिधींना निवेदने देऊनही परिस्थितीत अपेक्षित सुधारणा झालेली नाही. जुनी व अंडरग्राउंड पाईपलाईन, अपुरा दाब आणि नियोजनाचा अभाव या त्रिसूत्रीमुळे पाणीपुरवठा यंत्रणा कोलमडल्याचे चित्र आहे. “अधिकारी बदलले, पण व्यवस्था बदलली नाही,” अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
दरम्यान, अनेक दिवसांच्या विलंबानंतर काही भागांत नवीन मेन लाईन व्हॉल बसवण्याचे काम सुरू झाले आहे. मात्र हे काम अचानक गतीमान होण्यामागे निवडणुकीची चाहूल आहे की लोकप्रतिनिधींचा दबाव, याबाबत परिसरात चर्चांना उधाण आले आहे. “ज्याचे काम त्यानेच करावे,” अशी स्पष्ट भूमिका नागरिकांनी घेतली आहे.
कंत्राटदार व मनपा कर्मचारी पहाटेपासून ते उशिरापर्यंत काम करत असल्याचे दिसून येत असले तरी, प्रत्यक्षात नागरिकांना दिलासा मिळालेला नाही. पाणी उपलब्ध असूनही ते योग्य दाबाने घरापर्यंत पोहोचत नसल्याने परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे.
शहरातील अनेक भागांत अजूनही जुन्या पाईपलाईन्सवरच अवलंबून राहावे लागत आहे, तर काही ठिकाणी नवीन लाईन्स टाकण्यात आल्या आहेत. 3, 6 आणि 8 इंच क्षमतेच्या लाईन्स बसवण्यात आल्या असल्या तरी, वाढत्या लोकसंख्येचा विचार न करता केलेल्या नियोजनामुळे जुन्या कनेक्शनधारकांना कमी दाबाचा फटका बसत आहे. या पार्श्वभूमीवर, नेमकी चूक कुठे होते आहे याचे सखोल तांत्रिक विश्लेषण करून तातडीने ठोस उपाययोजना करणे आवश्यक आहे. मनपाने नियुक्त केलेल्या अभियंत्यांची जबाबदारी आता अधिक वाढली असून, प्रशासन या प्रश्नाकडे किती गांभीर्याने पाहते, याकडे संपूर्ण प्रभागाचे लक्ष लागले आहे.