टीसीएस प्रकरणात वाढती गुंतागुंत; तपास तांत्रिक पुराव्यांकडे, दोन आरोपींना पोलिस कोठडी

हि बातमी पुढील ग्रुपवर पाठवा

नाशिक (प्रतिनीधी) : टीसीएस कंपनीशी संबंधित अत्याचार आणि कथित धर्मांतर प्रकरणात तपासाला वेग आला असून तिसऱ्या गुन्ह्यातील संशयित शफी शेख आणि रझा मेमन यांना जिल्हा व सत्र न्यायालयाने १८ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी आर. सी. नरवाडिया यांच्या न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून हा निर्णय दिला.

सरकारी पक्षातर्फे सहाय्यक संचालक किरण बेंडभर आणि सहाय्यक सरकारी अभियोक्ता अनिकेत आव्हाड यांनी न्यायालयात सांगितले की, संशयितांची गुन्हा करण्याची पद्धत समान असली तरी पीडित महिला वेगवेगळ्या असून घटना विविध कालावधीत घडल्या आहेत. जप्त मोबाईलमधील तांत्रिक माहिती तसेच ‘व्हॉट्सॲप चॅट’ मिळवणे अद्याप बाकी असून तपासासाठी अधिक वेळ आवश्यक आहे. संशयितांच्या बाजूने वकील राहुल कासलीवाल यांनी सर्व गुन्हे एकाच ठिकाणी घडल्यामुळे एकत्रित सुनावणी करण्याची मागणी केली. मात्र न्यायालयाने सरकारी पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरत पोलिस कोठडी सुनावली.

दरम्यान, मुख्य संशयित दानिश शेख, आसिफ अन्सारी, तौसिफ अत्तार आणि शाहरुख कुरेशी हे सध्या नाशिकरोड कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत. या प्रकरणात आतापर्यंत नऊ गुन्हे दाखल झाले असून आठ महिला आणि एका पुरुषाने फिर्याद दिली आहे. न्यायालय परिसरात संशयितांचे नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते. एका नातेवाइकाने माध्यमांशी बोलताना, “दोषी असल्यास कठोर शिक्षा द्या; मात्र या प्रकरणातून धार्मिक वाद निर्माण केला जात आहे,” असा आरोप केला. तपासात अडथळा येऊ नये आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी संबंधित आयटी कंपनीने कार्यालय तात्पुरते बंद ठेवत ‘वर्क फ्रॉम होम’चे आदेश दिले आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार, तपास आता तांत्रिक पुराव्यांवर केंद्रित असून मोबाईलमधील ‘व्हॉट्सॲप चॅट’ आणि सोशल मीडियावरील संवादातून महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता आहे.


हि बातमी पुढील ग्रुपवर पाठवा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *