शुभम पार्क येथे भरधाव बाईक रायडरचा थरार
वाटसरू रक्तबंबाळ; ट्रिपल सीट युवक पसार
📍 नाशिक | प्रतिनिधी
नाशिक शहरातील शुभम पार्क परिसरात रविवारी रात्री भरधाव वेगातील ट्रिपल सीट दुचाकीस्वारांनी अक्षरशः थरार निर्माण केला. भरधाव वेगाने येणाऱ्या दुचाकीने रस्त्यावरून जात असलेल्या एका अज्ञात वाटसरूला जोरदार धडक दिल्याने तो गंभीर जखमी झाला. अपघातानंतर दुचाकी किराणा दुकानासमोरील पोलावर जाऊन आदळल्याने पोलही वाकला.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, MH15 KJ 9601 क्रमांकाच्या दुचाकीवर तीन युवक ट्रिपल सीट बसून धोकादायक पद्धतीने रायडिंग करत होते. रात्री सुमारे ९ वाजेच्या सुमारास शुभम पार्क परिसरात त्यांनी रस्त्यावरील वाटसरूला जोरदार धडक दिली. धडकेनंतर परिसरात एकच गोंधळ उडाला असून नागरिकांची मोठी गर्दी जमली होती.
अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी संबंधित युवकांना पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, परिस्थितीचा फायदा घेत तिन्ही युवक घटनास्थळावरून पसार होण्यात यशस्वी ठरले.
घटनेची माहिती मिळताच अंबड पोलीस ठाणे चे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. जखमी वाटसरूला उपचारासाठी मोरवाडी येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे.
या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले असून भरधाव वाहनचालकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. या प्रकरणाचा पुढील तपास अंबड पोलीस ठाणे करत आहे.