जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर खानदेशाच्या कन्येची अमेरिकेत यशस्वी भरारी
नाशिक प्रतिनिधी : नाशिक येथील रहिवासी श्री. अनिल रूपला बागले यांची कन्या तेजस्विनी अनिल बागले हिने आपल्या अथक परिश्रम, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर डॉक्टरेट पदवी संपादन करत उल्लेखनीय यश मिळविले आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही शिक्षणाची कास न सोडता तिने मिळविलेले हे यश आज अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. आपल्या कुटुंबाचे, आर्वी गावाचे तसेच संपूर्ण खानदेशाचे नाव उज्ज्वल करणाऱ्या तेजस्विनीवर सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
लहानपणापासूनच अभ्यासू, जिज्ञासू आणि ध्येयवेडी असलेल्या तेजस्विनीने शिक्षणात सातत्याने उज्वल यश मिळविले. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या शाखेत बी.ई. शिक्षण घेताना तिने तब्बल ९८ टक्के गुण मिळवत संदीप फाउंडेशनमध्ये प्रथम क्रमांक पटकावला. तिच्या गुणवत्तेची दखल घेत तिची अमेरिकेसाठी निवड करण्यात आली. पुढे अमेरिकेतील विविध शैक्षणिक प्रक्रिया आणि परीक्षा यशस्वीरित्या पूर्ण करत तिला रोवन युनिव्हर्सिटी, न्यूयॉर्क येथे प्रवेश मिळाला.

अमेरिकेत उच्च शिक्षण घेत असताना तेजस्विनीने संशोधन क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत डॉक्टरेट पदवी संपादन केली. अत्यंत कठीण अभ्यासक्रम, संशोधन आणि परदेशातील स्पर्धात्मक वातावरणात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करत तिने हे यश मिळविले आहे. दरम्यान, तेजस्विनीच्या आयुष्यात मोठा दुःखद प्रसंगही आला. गेल्या ८ फेब्रुवारी रोजी तिच्या आईचे दुर्दैवी निधन झाले. आईच्या निधनामुळे संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला होता. मात्र, या कठीण प्रसंगातही खचून न जाता तेजस्विनीने आपल्या आई-वडिलांनी पाहिलेल्या स्वप्नांना पूर्ण करण्याचा निर्धार कायम ठेवला. आईच्या आठवणी, तिचे संस्कार आणि वडिलांचे प्रोत्साहन यांच्याच बळावर तिने शिक्षणाचा प्रवास सुरू ठेवत अखेर डॉक्टरेट पदवी संपादन केली.
“माझ्या आई-वडिलांच्या प्रेरणा, आशीर्वाद आणि त्यागामुळेच मी हे यश मिळवू शकले. माझ्या आईने माझ्यावर केलेले संस्कार आणि वडिलांनी दिलेला पाठिंबा यामुळेच मी प्रत्येक अडचणीवर मात करू शकले,” अशी भावना तेजस्विनीने व्यक्त केली. तेजस्विनीच्या यशाबद्दल बोलताना तिचे वडील श्री. अनिल रूपला बागले यांनी भावूक होत सांगितले की, “मुलगी तेजस्विनी ही लहानपणापासूनच अभ्यासू व जिज्ञासू होती. शिक्षणात काहीतरी मोठे करायचे हे तिचे स्वप्न होते. तिने दिवस-रात्र मेहनत घेत आपल्या ध्येयासाठी संघर्ष केला. तिच्या कष्टाचे आज चीज झाले असून वडील म्हणून मला तिचा अभिमान वाटतो. मुलीने आमच्या कुटुंबाचे आणि गावाचे नाव मोठे केले आहे.” तेजस्विनीच्या या यशामुळे आर्वी गावात तसेच परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. गावातील नागरिक, नातेवाईक, मित्रपरिवार तसेच विविध सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवरांकडून तिचे अभिनंदन करण्यात येत आहे. अनेकांनी तेजस्विनीचे यश हे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी असल्याचे सांगितले आहे. आजच्या स्पर्धेच्या युगात मेहनत, सातत्य आणि आत्मविश्वासाच्या जोरावर कोणतेही ध्येय गाठता येते, हे तेजस्विनी बागले हिने आपल्या यशातून सिद्ध करून दाखविले आहे. तिच्या या यशामुळे खानदेशाच्या शैक्षणिक क्षेत्रात अभिमानाची नवी भर पडली आहे.
