इच्छाशक्ती आणि परिश्रमाच्या जोरावर नुरा शेख हिचे सी.ए. परीक्षेत घवघवीत यश!

इच्छाशक्ती आणि परिश्रमाच्या जोरावर नुरा शेख हिचे सी.ए. परीक्षेत घवघवीत यश!

जिल्हा परिषद शाळा ते आई; आता सनदी लेखापाल म्हणून नवीन ओळख

नाशिक: दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICAI) तर्फे घेण्यात आलेल्या सी.ए. (CA) अंतिम परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून, यामध्ये नाशिक येथील नुरा हुसेन शेख हिने घवघवीत यश संपादन केले आहे. अत्यंत कठीण मानल्या जाणाऱ्या या परीक्षेत यश मिळवून तिने आपल्या कुटुंबासह, गाव व शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

खडतर प्रवास आणि परिस्थितीवर मात करत केले यश संपादन

नुरा हुसेन शेख ही मूळची पालखेड धरण येथील शेतकरी कुटुंबातील. येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक व माध्यमिक शाळेत शिक्षण पूर्ण झाले. तर दिंडोरी येथील महाविद्यालयात वाणिज्य (Commerce) शाखेतून आपले उच्च शिक्षण पूर्ण केले.

सी.ए. बनण्याचे स्वप्न उराशी बाळगून ते पूर्ण करण्यासाठी तिने लग्नानंतरही सीए चा अभ्यास चालूच ठेवला. कुटुंबाचा व मुलीचा सांभाळ करत अत्यंत खडतर परिस्थितीतही चिकाटीने अभ्यास केला. परीक्षा काळात वडिल आजारपणामुळे दवाखान्यात उपचार घेत होते परिस्थिती चिंताजनक व गंभीर असताना ही, आशा कठीण प्रसंगाला तोंड देत कुठेही न डगमगता, केवळ कठोर परिश्रम आणि योग्य नियोजनाच्या जोरावर तिने हे यश संपादन केले.

“हे यश केवळ माझे नसून माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे माझे आई-वडील आणि मला सातत्याने मार्गदर्शन व प्रोत्साहन देणारे माझे पती आरीफ खान मन्सुरी यांचे आहे. भविष्यात एक प्रामाणिक आणि कुशल सी.ए. म्हणून देशाच्या आर्थिक विकासात योगदान देण्याचा माझा मानस असल्याची भावना यावळी नुरा हुसेन शेख हिने व्यक्त केली”.

सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव

नुरा हुसेन शेख हिच्या या अभूतपूर्व यशाची बातमी सर्वत्र पसरल्याने पालखेड धरण तसेच नाशिक येथे आनंदाचे वातावरण पसरले आहे. तिच्या या यशाबद्दल राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर, परिसरातील प्रतिष्ठित नागरिक यांच्याकडून भरभरून कौतुक होत असून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या जात आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *