प्रभाग क्र. २८ मधील नागरिकांचा पाणीप्रश्नी संताप शिगेला; प्रत्येक समस्येचे खापर लोकप्रतिनिधींवरच…

प्रभाग क्र. २८ मधील नागरिकांचा पाणीप्रश्नी संताप शिगेला; प्रत्येक समस्येचे खापर लोकप्रतिनिधींवरच…

नाशिक | प्रतिनिधी

प्रभाग क्र. २८ मध्ये गेल्या काही दिवसांपासून पाणीटंचाईसह विविध नागरी समस्यांनी नागरिकांचे जगणे त्रस्त झाले आहे. अपुरा पाणीपुरवठा, स्वच्छतेचे प्रश्न, रस्त्यांची दुरवस्था आणि मूलभूत सुविधांचा अभाव यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र प्रत्येक समस्येसाठी थेट लोकप्रतिनिधींनाच जबाबदार धरले जात असल्याने प्रशासनाच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

शनिवारी पाणीपुरवठा बंद राहिल्याने रविवारी अनेक भागांमध्ये पाण्यासाठी नागरिकांची मोठी तारांबळ उडाली. टँकरची मोठ्या प्रमाणात मागणी असताना संपूर्ण प्रभागासाठी केवळ एकच टँकर उपलब्ध असल्याचे चित्र पाहायला मिळाले. परिणामी अनेक कुटुंबांना खासगी टँकर विकत घेऊन पाण्याची व्यवस्था करावी लागली. या परिस्थितीमुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून त्याचा रोष लोकप्रतिनिधींवर निघताना दिसत आहे.

स्थानिक लोकप्रतिनिधी प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करून नागरिकांच्या समस्या मांडत असले, विविध विभागांशी समन्वय साधत असले तरी प्रत्यक्ष अंमलबजावणीतील त्रुटी, अपुरे नियोजन, मनुष्यबळाची कमतरता आणि यंत्रणांची निष्क्रियता यामुळे प्रश्न कायम राहत असल्याची चर्चा आहे. अशा परिस्थितीत नागरिकांच्या त्रासासाठी केवळ लोकप्रतिनिधींनाच जबाबदार धरणे कितपत योग्य आहे, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

प्रभागातील नागरिकांचे म्हणणे आहे की, समस्या कोणाच्या अखत्यारीत असो, त्यावर तातडीने उपाय होणे गरजेचे आहे. प्रशासन, संबंधित विभाग आणि लोकप्रतिनिधी यांनी समन्वयाने काम करून पाणीपुरवठा आणि इतर मूलभूत सुविधांबाबत ठोस व प्रभावी उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी जोर धरत आहे.

नागरिकांना आता आश्वासनांपेक्षा प्रत्यक्ष कृतीची अपेक्षा आहे. प्रशासनाने जबाबदारी स्वीकारून नियोजनबद्ध पद्धतीने काम केल्यासच प्रभाग क्र. २८ मधील नागरिकांना या समस्यांमधून कायमस्वरूपी दिलासा मिळू शकणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *