नाशिक प्रतिनिधी / : 2024 विधानसभा सार्वत्रिक निवडणूक अंतर्गत जिल्ह्यातील 15 विधानसभा मतदारसंघासाठी शनिवार 23 नोव्हेंबर 2024 रोजी सकळी 8 वाजेपासून मतमोजणी सुरू होणार आहे. यासाठी 15 मतमोजणीच्या ठिकाणी आवश्यक तयारी झाली असून जिल्हा प्रशासन सज्ज आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जलज शर्मा यांनी दिली आहे.आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मध्यवर्ती सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत जिल्हा निवडणूक अधिकारी शर्मा बोलत होते. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. शशिकांत मंगरूळे, तहसीलदार (निवडणूक) शाम वाडकर यांच्यासह माध्यम प्रतिनिधी उपस्थित होते.
मतदानानंतर मतदान यंत्रे संबंधित विधानसभा मतदारसंघाच्या स्ट्राँग रूम मध्ये त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्थेत सीसीटीव्ही निगराणीखाली ठेवण्यात आलेले आहेत. मतमोजणी निरीक्षक यांचे उपस्थितीत ईव्हीएम मतमोजणीसाठी नियुक्त कर्मचारी यांची तिसरी सरमिसळ मतमोजणीच्या दिवशी 23 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 5 वाजता करण्यात येवून व संबंधित कर्मचाऱ्यांना टेबल नेमून देण्यात येणार आहे. मतमोजणीसाठी सकाळी 7.30 वाजता निवडणूक लढविणारे उमेदवार प्रतिनिधी तसेच आयोगाकडून नियुक्त करणेत आलेले मतमोजणी निरिक्षक यांचे उपस्थितीत स्ट्राँग रूम उघडणेत येईल. लोकप्रतिनिधीत्व अधिनियम,1951 चे कलम 128 अन्वये निवडणूक निर्णय अधिकारी सर्व कर्मचा्-यांना व मतमोजणी प्रतिनिधींना गोपनीयतेची शपथ देतील. भारत निवडणूक आयोगाकडून 15 विधानसभा मतदारसंघ निहाय मतमोजणी निरीक्षक नियुक्त करणेत आलेले आहेत. त्यांच्या निगराणीखाली मतमोजणीची संपूर्ण प्रक्रीया पार पडणार आहे.