नवीन सिडको | प्रतिनिधी : अलीकडे झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक भागांमध्ये पाणी साचणे, ड्रेनेज तुंबणे, रस्त्यांची दुरवस्था तसेच आरोग्यविषयक समस्या निर्माण झाल्या आहेत. नागरिकांना पुन्हा अशा परिस्थितीला सामोरे जावे लागू नये, यासाठी महापालिकेच्या विशेष ‘टास्क फोर्स’ने प्रथमच सिडको परिसरातील प्रभाग क्रमांक २९ मध्ये व्यापक पाहणी मोहीम राबवली. नगरसेवक मुकेश शहाणे यांच्या पंडितनगर येथील कार्यालयापासून पाहणी दौऱ्याला सुरुवात करण्यात आली. यावेळी प्रभागातील विविध भागांची पाहणी करून नागरिकांच्या तक्रारी जाणून घेण्यात आल्या. विशेष म्हणजे, केवळ पाहणीपुरते न थांबता अनेक ठिकाणी संबंधित विभागांना तातडीच्या सूचना देऊन जागेवरच आवश्यक उपाययोजना सुरू करण्यात आल्या. पाहणीदरम्यान ड्रेनेज तुंबणे, रस्त्यांची खराब अवस्था, साचलेला कचरा तसेच पावसाचे पाणी साचण्याच्या समस्या निदर्शनास आल्या. संबंधित विभागांना तत्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच पावसाळ्यानंतर डेंग्यू, मलेरिया यांसारख्या साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रभागात औषध फवारणी व धूर फवारणी तातडीने करण्याचे आदेश देण्यात आले. नागरिकांना स्वच्छ व योग्य दाबाने पाणीपुरवठा करण्याबाबतही संबंधित अधिकाऱ्यांना सूचना करण्यात आल्या.
या पाहणी मोहिमेत नगरसेवक मुकेश शहाणे, स्मिताताई हिरे, छायाताई देवांग, भूषण राणे, मनपाचे विभागीय अधिकारी नानासाहेब साळवे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता हेमचंद्र नांदुर्डीकर, सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी विभागाचे उपअभियंता हेमंत पठे, विभागीय स्वच्छता निरीक्षक गांगुर्डे यांच्यासह प्रशांत परब, मिलिंद जाधव, मोहन गीते, प्रतिक माळोदे, हिमांशू बोरीचा, विविध विभागांचे कर्मचारी आणि सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
“नागरिकांच्या तक्रारी प्राधान्याने सोडवा; हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही” – मुकेश शहाणे
पाहणीदरम्यान टास्क फोर्स सदस्यांनी थेट नागरिकांशी संवाद साधला. अनेक नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही स्थानिक पातळीवरील काही अधिकारी समस्यांकडे दुर्लक्ष करतात, तक्रारींची वेळेत दखल घेतली जात नाही आणि कामांमध्ये विलंब होतो, अशी नाराजी व्यक्त केली. यावर प्रतिक्रिया देताना नगरसेवक मुकेश शहाणे म्हणाले, “नागरिकांच्या तक्रारींबाबत आम्ही अत्यंत गंभीर आहोत. ज्या ठिकाणी कामाचा दर्जा निकृष्ट आढळेल किंवा नागरिकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष केले जाईल, तेथे कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही. प्रभागातील समस्यांचे त्वरित निराकरण करण्यासाठी संबंधित विभागांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या असून अनेक ठिकाणी जागेवरच कामांना सुरुवात करण्यात आली आहे.”
नागरिकांच्या समस्या प्राधान्याने सोडवून प्रभागात स्वच्छता, आरोग्य आणि विकासकामांना गती देण्याचा निर्धार या विशेष टास्क फोर्स मोहिमेतून व्यक्त करण्यात आला.