नाशिक जिल्ह्यात मतदार पडताळणी मोहिमेला वेग; अंतिम मुदतीपूर्वी पडताळणी पूर्ण करण्याचे प्रशासनाचे आवाहन

SIR मोहिमेसाठी बीएलओंना सूचना; लोकप्रतिनिधींच्या संपर्क कार्यालयांतून नागरिकांना मार्गदर्शन

नाशिक : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राज्यभर सुरू असलेल्या विशेष मतदार यादी सघन पुनर्पडताळणी (Special Intensive Revision – SIR) मोहिमेला नाशिक जिल्ह्यात अधिक वेग आला आहे. जिल्हा प्रशासन, निवडणूक विभाग आणि नियुक्त बूथ लेव्हल अधिकारी (BLO) यांच्या माध्यमातून मतदारांची माहिती अद्ययावत करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून, अंतिम मुदतीपूर्वी सर्व पात्र मतदारांनी आपली पडताळणी पूर्ण करावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

मतदार यादीतील प्रत्येक नोंद अचूक, अद्ययावत आणि पारदर्शक राहावी, बनावट किंवा दुबार नोंदी टाळल्या जाव्यात तसेच पात्र नागरिकांचे मतदानाचे हक्क सुरक्षित राहावेत, या उद्देशाने ही विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत प्रत्येक मतदाराची वैयक्तिक माहिती, राहण्याचा पत्ता, जन्मतारीख, कुटुंबीयांचा तपशील तसेच इतर आवश्यक बाबींची खातरजमा करून SIR फॉर्म भरून घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. यासाठी जिल्ह्यातील सर्व नियुक्त बीएलओंना त्यांच्या यादी भाग क्रमांकानुसार (Part Number) संबंधित मतदारांशी संपर्क साधून पडताळणी पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. अनेक बीएलओ घराघरात जाऊन नागरिकांकडून आवश्यक माहिती व कागदपत्रे स्वीकारत आहेत. याशिवाय मतदान केंद्र, शासकीय कार्यालये तसेच विविध सुविधा केंद्रांवरही नागरिकांना पडताळणीसाठी मदत उपलब्ध करून दिली जात आहे.

दरम्यान, नागरिकांना त्यांच्या भागातील संबंधित बीएलओ शोधण्यात अडचण येऊ नये म्हणून अनेक लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेतला आहे. त्यांच्या संपर्क कार्यालयांमध्ये मतदारांना भाग क्रमांक शोधून देणे, संबंधित बीएलओचे नाव व मोबाईल क्रमांक उपलब्ध करून देणे, SIR फॉर्म भरण्यासाठी मार्गदर्शन करणे तसेच आवश्यक कागदपत्रांची माहिती देणे अशी सेवा दिली जात आहे. या उपक्रमामुळे हजारो नागरिकांना वेळेत पडताळणी पूर्ण करणे सोपे झाले असून, अनेक बीएलओ अधिकाऱ्यांनीही लोकप्रतिनिधी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या सहकार्याचे कौतुक केले आहे.

निवडणूक विभागाने नागरिकांना घरी येणाऱ्या बीएलओंना आवश्यक सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. पडताळणी करताना आधार कार्ड, जन्मतारीख किंवा वयाचा पुरावा, राहत्या पत्त्याचा पुरावा तसेच आवश्यक असल्यास इतर संबंधित कागदपत्रे तयार ठेवावीत, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे. तसेच नागरिकांनी अधिकृत ऑनलाइन सुविधांचा वापर करून किंवा संबंधित बीएलओशी संपर्क साधून आपली माहिती तपासून घ्यावी, असेही आवाहन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, अंतिम मुदतीच्या जवळ येत असल्याने जिल्ह्यातील विविध भागांत पडताळणीसाठी नागरिकांची गर्दी वाढत आहे. त्यामुळे शेवटच्या दिवसाची वाट न पाहता नागरिकांनी शक्य तितक्या लवकर SIR फॉर्म भरून प्रक्रिया पूर्ण करावी, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. मतदार यादीतील अचूक माहिती ही मुक्त, निष्पक्ष आणि पारदर्शक निवडणूक प्रक्रियेचा महत्त्वाचा पाया असल्याने प्रत्येक पात्र मतदाराने या मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदविणे आवश्यक असल्याचे प्रशासनाने नमूद केले आहे.

“नागरिकांनी भारत निवडणूक आयोगाचे अधिकृत ECIENT ॲप आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून त्याचा वापर करावा. या ॲपच्या माध्यमातून संबंधित बीएलओचे नाव, भाग क्रमांक आणि संपर्क क्रमांक सहज मिळू शकतो. मी स्वतः या ॲपच्या माध्यमातून ५०० हून अधिक मतदारांना त्यांचे बीएलओ शोधून दिले असून त्यांचे संपर्क क्रमांक उपलब्ध करून दिले आहेत. त्यामुळे अनेक नागरिकांची पडताळणी वेळेत पूर्ण होण्यास मदत झाली आहे. मात्र काही ठिकाणी पूर्वीचे बीएलओ बदलून त्यांच्या जागी नवीन अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अद्ययावत माहिती वेळेवर उपलब्ध न झाल्यामुळे अनेक मतदारांना संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधताना अडचणी येत आहेत. प्रशासनाने बीएलओंची अद्ययावत यादी आणि संपर्क माहिती नियमितपणे प्रसिद्ध केल्यास नागरिकांची गैरसोय टळेल आणि SIR मोहीम अधिक प्रभावीपणे पूर्ण होईल.”

– साहेबराव चौधरी, नागरिक

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *