अंबडगावात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात; फटाक्यांच्या आतषबाजीने जल्लोष

अंबडगाव (प्रतिनिधी):  “एक गाव एक जयंती” ही परंपरा जपत अंबडगाव येथील ग्रामस्थांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात, एकोप्याच्या वातावरणात आणि जल्लोषात साजरी केली. सायंकाळी पाथर्डी फाटा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून मिरवणुकीचे अंबड गावाकडे प्रस्थान करण्यात आले. या मिरवणुकीत वाद्यांचा गजर, ढोल-ताशांचा नाद आणि डिजेच्या तालावर चिमुकल्यांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत नृत्य केले. जयभीमच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.

मिरवणूक अंबड गावात पोहोचल्यानंतर भव्य फटाक्यांच्या आतषबाजीने आकाश उजळून निघाले. रंगीबेरंगी रोषणाई व आतषबाजीमुळे वातावरण अधिकच जल्लोषमय झाले होते. ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहात हा सोहळा साजरा करत आनंद व्यक्त केला. यानंतर राष्ट्रगीताने जयंतीची सांगता करण्यात आली. या कार्यक्रमात गावातील सर्व समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. “एक गाव एक जयंती” या उपक्रमातून सामाजिक एकता, बंधुभाव आणि समतेचा संदेश देण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *