🛑 नाशिक बातमी | ब्रेकिंग न्यूज
दारणा धरणातून विसर्गात वाढ; 19,312 क्युसेक्स पाणी गोदावरी पात्रात, प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा
नाशिक | प्रतिनिधी
दारणा धरणातून सुरू असलेल्या पाण्याच्या विसर्गात वाढ करण्यात आली असून गुरुवार (23 जुलै) सायंकाळी 7 वाजल्यापासून धरणातून 19,312 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात येत असल्याची माहिती नाशिक पाटबंधारे विभागाने दिली आहे.
यापूर्वी धरणातून 15,498 क्युसेक्स विसर्ग सुरू होता. मात्र पावसाची स्थिती लक्षात घेऊन त्यामध्ये 3,814 क्युसेक्सची वाढ करण्यात आली आहे.
पाटबंधारे विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार, पावसाचे प्रमाण वाढल्यास विसर्गात आणखी वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे दारणा नदीपात्रालगत राहणाऱ्या नागरिकांनी विशेष सतर्कता बाळगावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
नदीपात्रात किंवा नदीकाठी ठेवलेले साहित्य, जनावरे व इतर वस्तू तातडीने सुरक्षित ठिकाणी हलवाव्यात. तसेच नागरिकांनी नदीपात्रात जाणे टाळावे आणि संबंधित प्रशासनानेही आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन कार्यकारी अभियंता, नाशिक पाटबंधारे विभाग यांनी केले आहे.