इगतपुरीत FDA आणि पोलिसांची संयुक्त कारवाई; ७९.२७ लाखांचा प्रतिबंधित पान मसाला व जर्दा जप्त, चार जणांवर गुन्हा दाखल
नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यात अन्न व औषध प्रशासन (FDA) आणि इगतपुरी पोलिसांनी संयुक्त कारवाई करत तब्बल ७९ लाख २७ हजार १९२ रुपयांचा प्रतिबंधित सुगंधित पान मसाला व जर्द्याचा साठा जप्त केला आहे. या प्रकरणी चार जणांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ३ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी नाशिक–मुंबई महामार्गावरील बोरठेंबा फाटा येथे संशयाच्या आधारे DD 01 Z 9366 क्रमांकाच्या आयशर ट्रकची तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान ट्रकमध्ये शासनाने बंदी घातलेला ‘प्रीमियम राजनिवास’ सुगंधित पान मसाला आणि ‘प्रीमियम झेन ०१ जाबराणी जर्दा’ यांचा मोठा साठा आढळून आला. सुमारे १० लाख रुपये किमतीच्या ट्रकसह एकूण ७९.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
अन्न व औषध प्रशासनाचे अन्नसुरक्षा अधिकारी सुहास जिभाऊ मंडलिक यांच्या फिर्यादीवरून इगतपुरी पोलीस ठाण्यात ट्रक चालक दिनेश पूनमचंद शर्मा, जालिम सिंग, भिवंडी येथील अज्ञात खरेदीदार आणि वाहन मालक अशा चार जणांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
विशेष म्हणजे, आरोपी जालिम सिंग याच्यावर यापूर्वीही ३ जुलै २०२६ रोजी अशाच प्रकारच्या बेकायदेशीर पान मसाला वाहतुकीचा गुन्हा दाखल असल्याची माहिती समोर आली आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास इगतपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक ए. डी. गायधनी करत आहेत.