नाशिक : सिंहस्थ कुंभमेळा २०२७च्या पार्श्वभूमीवर लाखो भाविकांच्या रेल्वे प्रवासाचे नियोजन अधिक सक्षम करण्यासाठी मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाने नाशिक परिसरातील पाच रेल्वे स्थानकांच्या विकासकामांना गती दिली आहे. देवळाली, नाशिक रोड, ओढा, खेरवाडी आणि कसबे सुकणे या स्थानकांचा सर्वांगीण विकास करून प्रथमच ‘मल्टी-स्टेशन पॅसेंजर डिस्ट्रिब्युशन मॉडेल’ राबविण्यात येणार आहे. त्यामुळे नाशिक रोड स्थानकावरील प्रचंड गर्दीचा ताण कमी होऊन भाविकांचे विविध स्थानकांवर नियोजनबद्ध वितरण शक्य होणार आहे.
सिंहस्थ काळात कोट्यवधी भाविक नाशिकमध्ये दाखल होतात. या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने दीर्घकालीन दृष्टीकोन ठेवून सर्व स्थानकांवर आधुनिक सुविधा उभारण्याचा निर्णय घेतला आहे. पाचही स्थानकांवर मिळून नऊ नवीन पादचारी पूल, विस्तारित फलाट, प्रशस्त शेड, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वच्छतागृहे, दिव्यांगांसाठी सुलभ सुविधा, होल्डिंग एरिया आणि अतिरिक्त रेल्वे मार्गांची उभारणी केली जात आहे. यामुळे गर्दीचे व्यवस्थापन, विशेष रेल्वेगाड्यांचे नियोजन आणि प्रवाशांची सुरक्षित हालचाल अधिक प्रभावी होणार आहे.
सिंहस्थ रेल्वे प्रकल्पाची ठळक वैशिष्ट्ये
- पाच स्थानकांचा एकत्रित विकास
- नऊ नवीन पादचारी पूल
- २४ डब्यांच्या रेल्वेसाठी सक्षम फलाट
- हजारो प्रवाशांसाठी होल्डिंग एरिया
- विस्तारित शेड आणि प्रतीक्षाक्षेत्र
- दिव्यांगांसाठी सुलभ सुविधा
- अतिरिक्त लूप लाईन्स व स्टेबलिंग यार्ड
- ‘मल्टी-स्टेशन’ मॉडेलमुळे नाशिक रोडवरील गर्दी कमी होणार
देवळाली स्थानक होणार दक्षिणेकडील प्रवेशद्वार : दक्षिण महाराष्ट्र व इतर राज्यांतून येणाऱ्या भाविकांसाठी देवळाली स्थानक महत्त्वाचे केंद्र म्हणून विकसित केले जात आहे. येथे सहा मीटर रुंदीचे दोन रॅम्पयुक्त पादचारी पूल, २४ डब्यांच्या रेल्वेसाठी नवीन उच्चस्तरीय फलाट, विद्यमान फलाटाचा विस्तार तसेच अतिरिक्त लूप लाईन्स उभारल्या जात आहेत. सुमारे ९,४३५ चौरस मीटर क्षेत्रात नवीन प्लॅटफॉर्म शेडही उभारण्यात येणार आहेत.
नाशिक रोड स्थानकावर सर्वाधिक भर : नाशिकचे मुख्य रेल्वे प्रवेशद्वार असलेल्या नाशिक रोड स्थानकावर सर्वाधिक सुविधा विकसित केल्या जात आहेत. येथे १२ मीटर रुंदीचा रॅम्पयुक्त पादचारी पूल, पूर्व बाजूस स्वतंत्र प्रवेश व निर्गमन व्यवस्था, नवीन पार्किंग, सर्क्युलेटिंग एरिया आणि फलाटांचे आधुनिकीकरण करण्यात येत आहे. फलाट क्रमांक १ चा विस्तार करून तो २४ डब्यांच्या रेल्वेसाठी सक्षम केला जात असून, फलाट क्रमांक ४ वर सुमारे ३,५०० चौरस मीटरचे नवीन शेड उभारण्यात येत आहे.
ओढा स्थानक ठरणार पर्यायी केंद्र :नाशिक रोडवरील गर्दी कमी करण्यासाठी ओढा स्थानकाला पर्यायी प्रवासी केंद्र म्हणून विकसित करण्यात येत आहे. विशेष रेल्वेगाड्यांच्या स्टेबलिंगसाठीही हे स्थानक महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. येथे नवीन आयलंड फलाट, दोन पादचारी पूल, ११,००९ चौरस मीटरचे शेड, अतिरिक्त लूप लाईन्स आणि स्टेबलिंग सुविधा उभारण्यात येत आहेत. तसेच प्रत्येकी २,५०० प्रवाशांची क्षमता असलेले दोन कायमस्वरूपी जलरोधक होल्डिंग एरिया तयार केले जाणार आहेत.
खेरवाडीची प्रवासी क्षमता वाढणार: खेरवाडी स्थानकाचा आधुनिक प्रवासी केंद्र म्हणून विकास केला जात आहे. येथे दोन नवीन उच्चस्तरीय फलाट, दोन पादचारी पूल, १५,७०० चौरस मीटरचे शेड, कायमस्वरूपी होल्डिंग एरिया आणि विस्तारित सर्क्युलेटिंग सुविधा उभारल्या जात आहेत. याशिवाय नवीन प्रवेशमार्ग, पादचारी मार्ग, संरक्षण भिंती, पाणी साठवण व्यवस्था आणि अतिरिक्त स्टेबलिंग लाईन्सची निर्मिती केली जाणार आहे.
कसबे सुकणे ठरणार उत्तरेकडील प्रवेशद्वार: उत्तरेकडून येणाऱ्या भाविकांसाठी कसबे सुकणे स्थानकाचा पर्यायी रेल्वे प्रवेशद्वार म्हणून विकास करण्यात येत आहे. येथे २४ डब्यांच्या रेल्वेसाठी सक्षम उच्चस्तरीय फलाट, दोन रॅम्पयुक्त पादचारी पूल, १०,२०० चौरस मीटरचे शेड, कायमस्वरूपी होल्डिंग एरिया आणि रेल्वे संचालनासाठी आवश्यक विविध सुविधा विकसित केल्या जात आहेत.