नाशिक: सिंहस्थ ध्वजारोहण सोहळ्याची आज रंगीत तालीम; ३२ विभागांना सूचना
सुरक्षा, वाहतूक आणि मान्यवरांच्या आगमन-निर्गमन व्यवस्थेची प्रत्यक्ष तपासणी होणार
नाशिक | दि. २७ ऑक्टोबर २०२६
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे ३१ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या ध्वजारोहण सोहळ्याची पूर्वतयारी म्हणून आज, मंगळवारी संपूर्ण कार्यक्रमाची रंगीत तालीम घेण्यात येणार आहे. यासोबतच गोदावरी महाआरती आणि अन्य शासकीय कार्यक्रमांच्या नियोजनाचीही तपासणी करण्यात येणार आहे.
नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह यांनी यासंदर्भात संबंधित ३२ विभागांना लेखी सूचना दिल्या आहेत.
सुरक्षा आणि समन्वयावर भर
मुख्य सोहळ्याच्या दिवशी सर्व कार्यक्रम निर्धारित वेळेत आणि सुरळीत पार पडावेत, यासाठी रंगीत तालमीचे आयोजन करण्यात आले आहे. सुरक्षा व्यवस्था, वाहतूक नियोजन, मान्यवरांचे आगमन व निर्गमन तसेच विविध शासकीय यंत्रणांमधील समन्वयाची प्रत्यक्ष चाचणी घेतली जाणार आहे.
या प्रक्रियेदरम्यान मनुष्यबळ, वाहने, आवश्यक साधनसामग्री आणि प्रवेश व निर्गमन मार्गांची पाहणी केली जाईल. तपासणीदरम्यान काही त्रुटी आढळल्यास त्यांची तातडीने दुरुस्ती करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. संबंधित अधिकारी, कर्मचारी आणि प्रतिनिधींनी नेमून दिलेल्या ठिकाणी वेळेपूर्वी उपस्थित राहण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.
दिवसभर विविध ठिकाणी पाहणी
रंगीत तालमीच्या नियोजनानुसार सकाळी ९ वाजता नाशिक विमानतळावर मान्यवरांचे आगमन, स्वागत, सुरक्षा आणि वाहन व्यवस्थेची पाहणी होणार आहे. सकाळी १० वाजता एमपीए गेस्ट हाऊसमध्ये निवास आणि प्रोटोकॉल व्यवस्थेचा आढावा घेतला जाईल.
सकाळी ११ वाजता मुख्य ध्वजारोहण सोहळ्याची तालीम होणार असून, त्यामध्ये सुरक्षा, धार्मिक विधी, शंखनाद आणि आसनव्यवस्थेची तपासणी केली जाईल. दुपारी त्र्यंबकेश्वर येथे धार्मिक विधी, मंदिर दर्शन, सुरक्षा आणि वाहतूक व्यवस्थेचा आढावा घेण्यात येणार आहे.
सायंकाळी ५.३० वाजता सार्वजनिक कार्यक्रमस्थळ आणि गोदावरी आरतीस्थळी अंतिम तालीम होणार आहे.
३१ ऑक्टोबरच्या सोहळ्याकडे लक्ष
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे विविध प्रशासकीय व धार्मिक कार्यक्रमांचे नियोजन सुरू आहे. रंगीत तालमीच्या माध्यमातून प्रत्यक्ष व्यवस्थेतील संभाव्य अडचणी दूर करून मुख्य सोहळा सुरक्षित, शिस्तबद्ध आणि सुरळीत पार पाडण्यावर प्रशासनाचा भर आहे.
नाशिक बातमी | नाशिक.