दिंडोरीचा निकाल दुपारी १२ पर्यंत, नाशिकचा ४ वाजेपर्यंत जाहीर होण्याची शक्यता!
नाशिक (प्रतिनिधी) : लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला आता अवघे २४ तास उरल्याने उमेदवार अन् कार्यकर्त्यांची धाकधूक वाढली असून, सर्वसामान्यांची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघात मतदानाचा टक्का काहीसा वाढल्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडी या दोघांनीही विजयाचा दावा केला आहे. दिंडोरी लोकसभेसाठी एक ईव्हीएम असल्याने एकूण २६ फेºया होणार असून, नाशिकसाठी दोन ईव्हीएम असल्यामुळे दुप्पट वेळ लागणार आहे. नाशिककरिता एकूण ३० फेºया होतील. दिंडोरीचा निकाल दुपारी १२ वाजेपर्यंत, तर नाशिकचा दुपारी ४ वाजेपर्यंत जाहीर होण्याची शक्यता आहे.
नाशिक आणि दिंडोरी लोकसभेसाठी गेल्या पाच वर्षांत मतदारांची संख्या वाढल्याने मतदानाचा टक्काही वाढला. त्यामुळे एकूण मतदारांचे प्रमाण कमी दिसत असले, तरी २०१९ च्या तुलनेत जास्त मतदान झाल्याने प्रशासनाने सुटकेचा नि:श्वास टाकला आहे. मतदान झाल्यानंतर आता उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींकडून आकडेमोड करून विजयाची राजकीय समीकरणे मांडली जात आहेत. विद्यमान खा. हेमंत गोडसे हे विजयी झाल्यास त्यांच्या नावे विक्रम नोंदविला जाईल, तर वाजे यांनी बाजी मारल्यास ते जायंट किलर ठरतील. यामुळेच नाशिकबाबत सर्वांचेच लक्ष लागून आहे. २० मेपासून अनेक राजकीय तर्क-वितर्क व्यक्त करत विजयाचे दावे-प्रतिदावे केले जात आहेत. आता सर्वांचे लक्ष निकालावर केंद्रीत झाले आहे. अंबड एमआयडीसीतील केंद्रीय वखार महामंडळाच्या गोदामात मतमोजणीची व्यवस्था करण्यात आली आहे. ४ जूनला सकाळी ८ वाजता मतमोजणीस प्रारंभ होईल. प्रथमत: पोस्टल मतदारांनी केलेल्या मतदानाची मोजणी होईल. यानंतर ईव्हीएममध्ये बंदिस्त मतमोजणीस प्रारंभ होईल. त्यासाठी प्रत्येक विधानसभानिहाय १४ टेबल असणार आहेत. प्रत्येक टेबलवर उमेदवारांचा एक प्रतिनिधी असेल. याप्रमाणे प्रत्येक उमेदवाराला सहा विधानसभा मतदारसंघांसाठी एकूण ८४ प्रतिनिधी नियुक्त करावे लागतील. उमेदवाराने निवडणूक निर्णय अधिका-यांना नियुक्तीचे पत्र देणे बंधनकारक असेल, तसेच उमेदवार प्रतिनिधींचे फोटो देणे आवश्यक आहे.
दरम्यान, गेल्या लोकसभेचा निकाल २३ मे २०१९ रोजी जाहीर झाला होता. उशिरापर्यंत प्रक्रिया सुरू राहिल्यामुळे उमेदवारांना मध्यरात्री प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले. यावेळीदेखील तेवढाच विलंब होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.