मनाेज जरांगे-पाटील यांच्या पश्चिम महाराष्ट्रातील शांतता रॅलीचा आज नाशकात समाराेप
५ लाख मराठा समाजबांधव उपस्थित राहणार : आयाेजकांचा दावा
नाशिक : मराठा आरक्षण आंदाेलनाचे नेते मनाेज जरांगे-पाटील यांनी गेल्या आठवडाभरापासून राज्यभरात सुरू केलेल्या शांतता रॅलीचा मंगळवारी (दि. १३) नाशिकमध्ये ४ किलाेमीटरची रॅली काढून समाराेप हाेणार आहे. आरक्षण आंदाेलनाची मशाल हाती घेत तपाेवनातून रॅलीस प्रारंभ हाेवून पंचवटीमार्गे सीबीएस परिसरातील शिवछत्रपती पुतळा येथे रॅलीचा समाराेप हाेईल. राज्यभरातून सुमारे ५ लाख मराठा समाजबांधवांच्या उपस्थितीचा आयाेजकांनी दावा केला असून या पार्श्वभूमीवर पेालिस यंत्रणेने जादा बंदाेबस्तासह रॅली मार्ग निश्चीत करून त्यातील वाहतूक पूर्णपणे बंद ठेवून पर्यायी मार्गाने वाहतूक वळविण्यात येणार आहे.
या शांतता रॅलीसाठी आयाेजन समितीकडून संपूर्ण तयारी पूर्ण करण्यात आली असून, संपूर्ण रॅली मार्गावर २००० स्वयंसेवक व हजाराे मराठा बांधव नियुक्त केले जाणार आहेत. सर्व स्वयंसेवकांना टी शर्ट आणि झेंडे वाटप करण्यात आले आहे. तपाेवनातून रॅलीला प्रारंभ हाेऊन आडगाव नाका,स्वामी नारायण चाैक, कारंजा मार्गे रॅली सीबीएस येथील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमाेर जाहीर सभेद्वारे समाराेप करण्यात येणार आहे. यावेळी राज्यभरातील शांतता रॅलीचा समाराेप हाेणार असून, मनाेज जरांगे-पाटील लाखाे मराठा बांधवांना संबाेधित करतील. यासाठी सीबीएस परिसरात २० बाय ३० आकाराचा स्टेज उभारण्यात आला असून, चारही बाजूंनी जरांगे-पाटील यांना पाहता-ऐकता येऊ शकेल अशी व्यवस्था करण्यात आली आहे. परिसरात २० स्क्रीन बसवण्यात आल्या आहेत. रॅली मार्गावर दाेन ठिकाणी अल्पाेपहाराची व्यवस्था करण्यात आली आहे. तर राज्यभरातून येणाऱ्या मराठा बांधवांनी शिदाेरी साेबत आणण्याचे आवाहनही आयाेजकांकडून करण्यात आले आहे.
शहर वाहतूक विभागाकडून मंगळवारी सकाळी ८ पासून सायंकाळी रॅली संपेपर्यंत तपाेवन, छत्रपती संभाजीनगर रस्ता, आडगाव नाका, पंचवटी, रविवार कारंजा, एमजीराेड, मेहेर सीबीएस भागातील रस्ते बंद करून पर्यायी मार्गाने वाहतूक वळवण्याबाबत आदेशित करण्यात अाले आहे.
——–
आज शाळांना सुटी
दरम्यान, आंदाेलनाच्या पार्श्वभूमीवर महापालिका, तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाकडून शहरातील शाळांना सुटी जाहीर करण्यात आली आहे. शांतता रॅली आणि जरांगे – पाटील यांची महासभा यामुळे शहरातील रस्ते बंद राहणार असल्याने प्रशासनाकडून आज हा निर्णय जाहीर करण्यात आला आहे.