माऊलींच्या पालखीचे नाशिकला आगमन होताच भक्तांकडून भव्य स्वागत!

नाशिक प्रतिनिधी : माधुरी जाधव:/ जय जय रामकृष्ण हरी, हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा आदी अभंग गात संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पंढरपूर पालखी सोहळ्याचे नाशिकला आगमन होताच, शहरवासीयांकडून भव्य स्वागत करण्यात आले. या वर्षापासून शासनाकडून पालखी सोहळ्याला दोन कोटी ४० लाख रुपयांचा आर्थिक निधी प्राप्त झाला असून, महाराष्ट्र शासनाकडून दरवर्षी असा निधी दिंडी सोहळ्याला प्राप्त होणार आहे. दोन दिवस नाशिक परिसरात मुक्काम केल्यानंतर पालखी सोहळा सिन्नरकडे रवाना होणार आहे. सातपूरहून शनिवारी (दि. २२) सकाळी ९ वाजता संत निवृत्तीनाथ महाराज पालखीचे त्र्यंबक रोडवरील पंचायत समिती कार्यालय आवारात आगमन झाल्यानंतर नाशिकमधील स्वागत समितीतर्फे स्वागत करण्यात आले.

यावेळी जिल्हाधिकारी जलज शर्मा, मनपा आयुक्त अशोक करंजकर, जि. प. प्रकल्प संचालिका प्रतिभा संगमनेरे, जि. प. उपमुख्य कार्यकारी रवींद्र परदेशी, महंत भक्तिचरणदास महाराज, ह.भ.प. महंत रामकृष्ण महाराज लहवितकर, संत निवृत्तीनाथ महाराज मंदिर विश्वस्त ट्रस्टचे अध्यक्षा कांचन जगताप, सचिव अमर ठोंबरे, दिंडीचे प्रमुख मानकरी नारायण मुठाळ, ह.भ.प. मोहन महाराज बेलापूरकर, पुजारी जयंत महाराज गोसावी, संत तुकाराम महाराजांचे वंशज ह.भ.प. बाळासाहेब महाराज देहूकर, पुंडलिक थेटे, अरुण पवार, शिवाजी चुंबळे, रमेश कडलग, रत्नाकर चुंबळे, सुधाकर काळे आदींसह सत्कार समितीचे नरहरी उगलमुगले व त्यांचे सहकारी उपस्थित होते. स्वागत समितीचे अध्यक्ष पद्माकर पाटील यांनी प्रास्ताविक, सचिन डोंगरे यांनी सूत्रसंचालन केले; तर ह.भ.प. नीलेश गाढवे यांनी आभार मानले.

निर्मलवारीसाठी प्रशासनाचे नियोजन

संत निवृत्तीनाथ महाराजांची वारी निर्मल व्हावी, यासाठी वारक-यांनी आपल्या मार्गावर कचरा राहणार नाही, यासाठी प्रयत्न करावयाचे आहेत. दिंडी मार्गावरील नाशिक व अहमदनगरमधील सर्व ग्रामपंचायतींना पत्रे पाठवून वारी गेल्यानंतर संबंधित परिसर स्वच्छ करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याशिवाय फिरते शौचालय वारक-यांसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे. गरज पडल्यास शिर्डी संस्थानचेही फिरते शौचालय वापरण्यास मिळू शकते. याशिवाय पिण्यासाठी पाणी, स्वयंपाक करण्यासाठी गॅस सिलिंडरची व्यवस्था, आरोग्य व्यवस्था चोख करण्यात आली आहे, असेही जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी यावेळी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *