हि बातमी पुढील ग्रुपवर पाठवा
महाराष्ट्र राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प २०२४-२५
महायुती सरकारच्या या कार्यकाळातील हा शेवटचा अर्थसंकल्प आहे. तसेच, विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अर्थसंकल्प सादर होत असल्याने या अर्थसंकल्पाकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष होत. या अर्थसंकल्पातून महिला, शेतकरी, वारकरी संप्रदाय यांच्यासह विविध घटकांसाठी मोठं मोठ्या योजनांची घोषणा केली. चला तर तज्ञाकडून जाणून घेऊ या महाराष्ट्र राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प २०२४ -२५.
राज्य सरकारने अर्थसंकल्पात केलेल्या घोषणाची प्रत्यक्षात अंमलबजावणी व्हावी
राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री यांनी आज सादर केलेल्या राज्याच्या अतिरीक्त अर्थसंकल्पाच्या माध्यमातून महिला, युवक, गरीब कष्टकरी शेतकरी तसेच विद्यार्थी, व्यापार, उदयोग व पर्यटनाकरीता ज्या काही उंदड घोषणा केलेल्या आहेत त्यात काही घटकांना समाधान मिळावेच पण त्याचबरोबर, राज्यसरकारने अर्थसंकल्पात नमूद केलेल्या बाबींची प्रत्यक्षात अंमलबजावणी करतांना काहीशी तारेवरची कसरत होण्याची शक्यता वाटते आहे. पंढरीच्या वाटेवर पायी जाणा-या वारक-यांच्या दिंडयांसाठी रु.२००००/, लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून गरीब कुटूंबांना ३ गॅस टाक्या, महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी रिक्षा योजनेतून आर्थिक मदत, यासारख्या नविन योजना जाहिर केल्या आहेत.
शेतक-यांच्या शेतीपंपाचे वीजबील माफीमुळे पाऊस नसला तरीसुध्दा शेतकरी वर्ग काही प्रमाणात आनंदी होण्याची शक्यता आहे. बी-बियाणांसाठी अनुदान, सिंचन योजना, शेतीमधील आधुनिकीकरण, शेतमालाचे मुल्यवर्धन-साठवणूक, बाजारपेठेचीउपलब्धता, पीककर्जासाठीची तरतूद, या सारख्या घोषणा करुन, शेतकरी वर्गाला स्वावलंबी बनवण्याचे स्वप्न या अर्थसंकल्पात रेखाटल्याचे दिसून येते. पेट्रोल व डिझेलवरील व्हॅट टॅक्स बाबत संपूर्ण राज्यात समान करपध्दतीची केलेली घोषणा, डिझेलवरील कर कपात, यामुळे मोठया शहरांसाठी पेट्रोल डिझेल अल्पप्रमाणात स्वस्त होण्याची शक्यता आहे.
मुद्रांक शुल्क, त्यासाठीची ऑनलाईन पध्दती, दंडाच्या रक्कमेत दिलेली सवलत, या सारखे घेतलेले निर्णय माजी सैनिकांसाठी लाभदायी ठरावेत. एकंदरीत राज्यात होवू घातलेल्या आगामी निवडणूकांचा अंदाज घेवून या अर्थसंकल्पात सावध पवित्रा घेतलेला जाणवतो.

नितीन डोंगरे
अध्यक्ष, नॉर्थ महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशन
राज्याचा अंतरिम अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस असला तरी सर्वसामान्यांना दिलासा देणारा
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प जाहीर करत घोषणांचा पाऊसच पाडला आहे. या अर्थसंकल्पात महिलांना केंद्रस्थानी ठेवून अनेक योजना सरकारने जाहीर केल्या. आठ लाख रुपयांपर्यंत कौटुंबिक उत्पन्न असणाऱ्या मुलींना मोफत उच्च शिक्षण आणि परीक्षा शुल्क माफ होणार असल्याने पालकांवरील शिक्षणाचे आर्थिक दडपण दूर होणास मदत होईल. अन्नपूर्णा योजना – गॅस सिलिंडर प्रत्येकाला परवडेल यासाठी पात्र कुटुंबाला वर्षाला तीन गॅस सिलिंडर मोफत देणारी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना. महिला बचत गट निधीची रक्कम १५ हजाराहून ३० हजारांपर्यंत वाढवण्यात आली. २१ ते ६० वयोगटातील महिलांना मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेअंतर्गत दिड हजार दरमहा मिळणार यासोबतच उद्योजक महिला व व्यावसाय करू इच्छिता यांच्यासाठी आर्थिक पाठबळ मिळवून देणाऱ्या अनेक मोठ्या योजनांची घोषणा केली आहे. याव्यतिरिक्त युवकांना कार्यप्रशिक्षण विद्यावेतन यामुळे रोजगाराच्या संधी वाढण्यास मदत होईल. शेतकरी, दुग्धव्यासायिक याना अनुदान मिळणार आहे तर वारकऱ्यांसाठी वेगवेगळ्या निधीची घोषणा करण्यात आली. राज्यभरात पेट्रोल व डिझेल वरील मूल्यवर्धित कर एक समान करण्याची तरतूद केली आहे त्यामुळे पेट्रोल व डिझेलचे दर काही प्रमाणात का होईना कमी होऊन सर्वसामान्य नागरिक तसेच उद्योग व व्यापार क्षेत्राला दिलासा मिळणार आहे
विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने या घोषणा करण्यात आल्या असल्या तरी हा अर्थसंकल्प महिलांचे सक्षमीकरण, सर्वसमावेश व सर्वसाधारण लोक, शेतकरी यांना दिलासा देणार आहे.

योगेश भास्कर कातकाडे
जनसंपर्क प्रमुख – नॉर्थ महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशन
Post Views: 41
हि बातमी पुढील ग्रुपवर पाठवा