महापालिकेकडून २ लाख ५ हजार ८५४ गणेश मूर्तींचे संकलन
यंदा ५६०१ मूर्तींचे अधिक संकलन; घराेघरी शाडू मूर्तींचे विसर्जन प्रमाणही वाढले; पालिकेकहून ७२५ किलाे अमाेनियम बायकार्बाेनेट पावडरचे वाटप
प्रतिनिधी | नाशिक
गणेशोत्सव २०२४ पर्यावरणपूरक करण्याच्या दृष्टिकाेनातून नाशिक महापालिकेमार्फत मूर्तीदान करण्याचे आवाहन गणेशभक्तांना करण्यात आले. त्याला प्रतिसाद मिळाल्याने यावर्षी सहाही विभागांतून २ लाख ५ हजार ८५४ गणेशमूर्तींचे संकलन करण्यात आले.
पर्यावरण संरक्षणासह नदी प्रदूषण राेखण्यासाठी गणेश मूर्ती दान करणे व निर्माल्य संकलित करणे यासाठी नाशिक महापालिकेने नागरिकांना आवाहन केले. दहाव्या दिवशी (दि. १७) दिवसभरात पालिकेच्या सहाही विभागांत मिळून २ लाखाहून अधिक मूर्ती संकलित करण्यात यश आले. विविध विसर्जन ठिकाणांहून एकूण १७४.७८९ मे.टन निर्माल्य संकलित करण्यात आले. मनपाने नागरिकांना विसर्जनासाठी ७२५ किलो अमोनियम बायकार्बोनेट पावडर वाटप केल्याने अनेक भाविकांनी घराेघरी याद्वारे मूर्ती विसर्जन करत पर्यावरण संवर्धनाला हातभार लावला. गेल्या वर्षी एकूण २ लाख २५३ गणेश मूर्तीं आणि १५३.१५५ टन निर्माल्य संकलन करण्यात आले होते. यावर्षी शाडू मातीच्या मूर्तींची स्थापना करून घरीच विसर्जन अधिक केले गेले, तरीदेखील २ लाख ५ हजार ८५४ मूर्ती संकलित झाल्याची माहिती पर्यावरण, सार्वजनिक बांधकाम आणि घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली.
—
विविध सामाजिक संस्थांचाही पुढाकार
गणेशमूर्ती संकलन माेहिमेत महापालिकेला विविध सामाजिक संस्थांचे सहकार्य लाभले. यात शहरातील विविध महाविद्यालयांतील एनसीसी कॅडेट्स, के. व्ही. नाईक कॉलेज, के. के. वाघ अभियांत्रिकी व पॉलिटेक्निक कॉलेज, एनडीएमव्हीपी कॉलेज, संदीप फाउंडेशन, गोखले एज्युकेशन संस्था, रोटरी क्लब आदी संस्थाचा समावेश होता.
—
विभागनिहाय श्री मूर्ती संकलन
पंचवटी : ७८६७७
नवीन नाशिक : २५२६१
नाशिकरोड : ४५१३८
नाशिक पूर्व : १०४२८
सातपूर : ३१११९
नाशिक पश्चिम : १५२३१