आयकर कायद्यातील तरतुदी नुसार टॅक्स ऑडिट काळजी पूर्वक हाताळा – सीए संजय वनबट्टे यांचे प्रतिपादन
_-आयकर कायदा कलम ४४ एडी लहान स्वरूपाच्या व्यवसायिकांसाठी अधिक उपयुक्त_
आयकर कायद्यातील कलम ४४ एबी व ४४ एडी याबाबतचे नियम हे व्यापाऱ्यांच्या उलाढालीनुसार लागू होत असतात. ज्या व्यवसायिकाची वार्षिक उलाढाल १ कोटी पेक्षा अधिक असेल अशा व्यवसायिकांना कर लेखापरीक्षण करणे अनिवार्य आहे. परंतु, ज्या व्यवसायिकांचे आर्थिक व्यवहार डिजिटल स्वरूपात आहेत अशा व्यावसायिकांची एकूण रिसिट च्या कमाल ५ टक्के कॅश रिसिट व एकूण खर्चाच्या ५ टक्के कॅश खर्च असेल तर अशा व्यवसायिकांकरिता मात्र ही मर्यादा १० कोटी आहे. तसेच ज्या व्यक्ती पेशाने व्यवसायिक आहेत अशांसाठी वार्षिक उलाढाल कमाल मर्यादा ५० लाख असल्याची माहिती सीए संजय वनबट्टे यांनी दिली.
नॉर्थ महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशन तसेच अहमदनगर व मालेगाव टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील कर सल्लागार, सीए, वकील व व्यावसायिकांसाठी टॅक्स ऑडिट या विषयावर ऑनलाईन वेबिणारचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे कोल्हापूर येथील तज्ञ सीए महावीर कापशे यांच्या हस्ते प्रमुख वक्ते सीए संजय वनबट्टे यांचा सत्कार करण्यात आला. आयकर कायद्यात नवीन झालेल्या बदलांचे दूरगामी परिणाम होणार असून आयकर कायदयातील कलम ४४ एडी लहान स्वरूपाच्या व्यवसायिकांसाठी अधिक उपयुक्त असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
नॉर्थ महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशनचे अध्यक्ष नितीन डोंगरे यांनी कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेत आयकर कायद्यात सातत्याने होणाऱ्या नवनवीन बदलांबाबत प्रत्येक करदात्यास, व्यवसायिकास याबद्दलची माहिती अद्ययावत असणे अतिशय महत्त्वाचे आहे व हि माहिती पोहचविणे महत्त्वाचे कार्य हे कर सल्लागार करत असतात. आयकर कायदा अतिशय काळजीपूर्वक वाचून, समजून घेतला पाहिजे. आपल्या विशिष्ट केसेस मध्ये कोणता कायदा लागू होतो हे लक्षात घेऊन त्याप्रमाणे पुढील कार्यवाही करणे महत्त्वाचे असते. या विषयीची सविस्तर माहिती कर सल्लागार यांनी समजून घेता यावी या उद्देशाने वेबिणारचे आयोजन करण्यात आले आल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
प्रमुख वक्ते यांचा परिचय श्री सुनील कराळे यांनी करून दिला तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऍड. पुरुषोत्तम रोहिडा यांनी केले तर आभारप्रदर्शन अनिल चव्हाण यांनी केले.
या वेबिनार मध्ये उत्तर महाराष्ट्रातील कर सल्लागार मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यशाळेच्या यशस्वी रित्या आयोजन करण्याकरिता ऍड.सतीश कजवाडकर, योगेश कातकाडे, पंकज भामरे याचबरोबर कार्यकारणी पदाधिकारी व सदस्य यांचे मोलाचे योगदान लाभले.