नाशकात भरधाव कारची पोलिस गस्त वाहनाला धडक; कारचालकासह पोलिस उपनिरीक्षक, अंमलदार जखमी
नाशिक (प्रतिनिधी) : इंदिरानगर बोगद्याकडून उंटवाडी सिग्नलकडे जाणाऱ्या पोलीस गस्त वाहनाला भरधाव वेगातील कारने पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात कारचालकासह पोलिस गस्त वाहनातील उपनिरीक्षकासह अंमलदार जखमी झाले आहेत. याप्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शांतीलाल विठ्ठल वाघ (५०, रा. जाधव संकुल, चुंचाळे शिवार, नाशिक) असे संशयित कारचालकाचे नाव असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे की, पोलीस अंमलदार गुलाब जाधव यांच्या फिर्यादीनुसार, मुंबई नाका पोलिस ठाण्याचे श्रेणी उपनिरीक्षक निसार शेख, अंमलदार गुलाब जाधव, पी. पी. बागुल हे पहाटे पावणे दोनच्या सुमारास गस्ती पथकाचे वाहनाने (एमएच १५ जेडी ५७३०) हद्दीत गस्तीवर होते. पोलिस गस्ती वाहन हे इंदिरानगर बोगद्याकडून सिटी सेंटर मॉल, उंटवाडी सिग्नलकडे जात होते. आरडी सर्कलजवळून हे पोलिस वाहन जात असतानाच पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या कारने (एमएच १५ जेएक्स २१५३) पोलीस वाहनाला धडक दिली. यात पोलिस वाहनातील शेख, जाधव, बागुल हे किरकोळ जखमी झाले. तर, कारचालक वाघ हे गंभीर जखमी झाले आहेत. गंभीर जखमी कार चालक वाघ यांना पोलिसांनी उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी मुंबई नाका पोलिसात गुन्हा दाखल असून, तपास हवालदार देविदास गाढवे करत आहेत.