नाशिक प्रतिनिधी/ केंद्र सरकारने पॅन कार्डच्या (PAN 2.0) नव्या आवृत्तीची घोषणा केली आहे. परंतु, यासाठी पॅन कार्ड धारकांना काहीही करण्याची आवश्यकता नाही. सरकारच्या वतीने नवीन अपडेटेड पॅन कार्ड थेट तुमच्या पत्त्यावर मिळणार आहे.
नवीन QR कोड असलेल्या पॅन कार्डसाठी जुन्या पॅन कार्ड धारकांना पुन्हा नव्याने वेगळा अर्ज सादर करण्याची आवश्यकता नाही; कारण पॅन क्रमांक हा कायम राहतो. मात्र, जर तुम्हाला QR कोडसह अपडेट केलेले पॅन कार्ड हवे असेल, तर तुम्ही पुनर्मुद्रणासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरून देऊ शकता.
पुनर्मुद्रित पॅन कार्डसाठी प्रक्रिया:
१. NSDL किंवा UTIITSL च्या अधिकृत वेबसाइटवर जा.
२. “Reprint PAN Card” किंवा “Change/Correction in PAN Data” या पर्यायावर क्लिक करा.
३. तुमचा पॅन क्रमांक, आधार क्रमांक (जर लिंक केलेला असेल) आणि इतर माहिती भरून अर्ज सादर करा.
४. अर्ज शुल्क भरून दिलेल्या पत्त्यावर QR कोडसह नवीन पॅन कार्ड मिळवू शकता.
या QR कोडमध्ये तुमची पॅन कार्डावरील माहिती डिजिटल स्वरूपात सुरक्षित केली जाते, जी भविष्यात अधिक सुरक्षिततेसाठी उपयोगी ठरते. महत्त्वाचे म्हणजे सध्य स्थितीत घडणाऱ्या विविध प्रकारच्या सायबर गुन्ह्यांची व्याप्ती लक्षात घेता पॅन कार्ड अपडेट करण्यासाठी जर कोणी फोन, मेसेज, लिंक किंवा ई-मेल पाठवले, तर त्याला उत्तर देऊ नका. कोणतीही माहिती किंवा OTP शेअर करू नका.
या बाबतीत पॅन धारकांनी जागरूक राहुन, सायबर फसवणुकीपासून स्वतःला जपावे अशी माहिती नॉर्थ महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशनचे अध्यक्ष नितीन डोंगरे यांनी दिली.