विद्युत कामांसाठी शनिवारी पुन्हा शहराचा पाणीपुरवठा राहणार बंद;‎ वारंवार खंडित पाणीपुरवठ्यामुळे नाशिककरांचा संताप

नाशिकच्या सर्व अपडेट साठी जॉईन करा नाशिक बातमी व्हाट्सअप ग्रुप 

 

प्रतिनिधी नाशिक शहर :/ गंगापूर धरण तसेच मुकणे धरणावरील पंपीग स्टेशनच्या विद्युतविषयक कामांसाठी वीज पुरवठा खंडीत करण्यात येणार असल्याने शनिवारी (दि. १) संपूर्ण नाशिक शहराचा पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. तर रविवारी (दि. २) सकाळी देखील कमी दाबाने पाणी पुरवठा हाेणार असल्याचे महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडून सांगण्यात आले आहे. विशेष म्हणजे गेल्या महिन्याभरात हा चाैथ्यांदा पाणी पुरवठा खंडीत करण्यात येत आहे. त्यामुळे नागरिक विशेषत: महिला संतप्त झाल्या आहेत. वीज अथवा दुरुस्तीची कामे टप्प्याटप्प्याने करण्यात येऊन पाणी पुरवठा सुरळीत ठेवावा असा सूर व्यक्त हाेत आहे.

गेल्यावर्षी पावसाने ओढ दिल्यामुळे नाशिककरांवर पाणी कपातीचे संकट आले होते. त्यातच मराठवड्यासाठी जायकवाडीला पाणी सोडल्यामुळे नाशिक महापालिकेच्या वार्षिक पाणी आरक्षणात ७०० दशलक्ष घनफुटाची कपात करण्यात आली होती. त्यामुळे मे महिन्यामध्ये पाणी कपातीचे ढग नाशिककरांवर घोगावत होते. सद्यस्थितीमध्ये रोज ६०० एमएलडी इतके पाणी गंगापूर आणि मुकणे धरण व अल्प प्रमाणात दारणा धरणावरून पुरवले जाते. दरम्यान, गेला पावसाळा चांगला झाल्याने धरणे तुडुंब भरली आहेत. मात्र हे पाणी ३१ जुलै पर्यंत पुरवण्यासाठी महापालिकेने नियोजन सुरू केले आहे. मात्र पंपींग स्टेशनवरील विविध कामे, विद्युत विभागाची वीज कामे यामुळे शनिवारी संपूर्ण नाशिक शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. त्याचप्रमारे रविवारी देखील सकाळचा पाणीपुरवठा कमी दाबाने होईल, असे महापालिकेतर्फे कळविण्यात आले आहे.

या कामांसाठी पाणी पुरवठा बंद

– गंगापूर धरणावर महापालिकेच्या पंपीग स्टेशनकरीता महावितरणच्या १३२ केव्ही सातपूर व महिंद्रा या दोन फिडरवरून ३३ केव्ही उच्च दाबाचा वीज पुरवठा करण्यात येतो. या पंपींग स्टेशनद्वारे महापालिकेच्या बाराबंगला, शिवाजीनगर, पंचवटी, निलगिरीबाग, गांधीनगर व नाशिकरोड जलशुध्दीकरण केंद्र येथे रॉ वॉटरचा पुरवठा करण्यात येतो. गंगापूर धरण येथे नवीन थेट जलवाहिनीअंतर्गत नवीन पंपीग स्टेशन उभारण्याकरीता काम सुरू करण्यात आले आहे. या कामात अडचणीच्या ठरणाऱ्या ३३ केव्ही दाबाच्या वीज वाहिनीचे शिफ्टींग करणे तसेच सबस्टेशन, पंप हाऊसमधील विद्युत विषयक कामे शनिवारी(दि. १) हाती घेतली जाणार आहेत.

– मुकणे धरण येथील पंपीग स्टेशनला गोंदे येथील महावितरणच्या रेमण्ड सबस्टेशन येथून एक्सप्रेस फिडरद्वारे जॅकवेकरीता ३३ केव्ही वीज पुरवठा केला जातो. मुकणे धरण पंपिंग स्टेशन येथील सबस्टेशन, पंप हाऊसमधील विद्युत विषयक कामे व इतर संबंधित कामे देखील हाती घेण्याचे महापालिकेचे नियोजन आहे.

– विविध जलशुध्दीकरण केंद्र येथील सबस्टेशनमधील कामे व स्मार्ट सिटी अंतर्गत शट डाऊन अंतर्गत फ्लो मीटर बसविणे तसेच विविध कामे महापालिकेकडून नियोजित आहेत. त्यामुळे गंगापुर धरण व मुकणे धरण येथुन सदर कालावधीत पंपीग करता येणार नसल्याने दरम्यान महापालिकेची सर्व जलशुध्दीकरण केंद्र बंद राहणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *