मविप्र युवास्पंदन स्पर्धेत सिन्नर महाविद्यायाची ६ कला प्रकारात बाजी

मविप्र युवास्पंदन स्पर्धेत सिन्नर महाविद्यायाची ६ कला प्रकारात बाजी 

सिन्नरला उपविजेतेपद: दाेन कला प्रकारात प्रथम तर चार कला प्रकारात द्वितीय क्रमांक

प्रतिनिधी | सिन्नर

विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेकडून आयाेजित करण्यात आलेल्या नाशिक मविप्र युवास्पंदन स्पर्धेत सिन्नर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी विविध ६ कलाप्रकारात बाजी मारली. महाविद्यालयाच्या कलावंतांनी समूह गीत भारतीय व पाश्चात्य समूह गायन प्रकारात प्रथम क्रमांक मिळवला. तर शास्त्रीय ताल वादन, शास्त्रीय स्वर वादन, शास्त्रीय गायन, पाश्चात्य वैयक्तिक गायन या चार कलाप्रकारात द्वितीय क्रमांक मिळवला. अंतिम स्पर्धेत प्राप्त केलेल्या पारितोषिकांच्या एकूण गुणांच्या जोरावर सिन्नर महाविद्यालयाने मानाचे उपविजेतेपद पटकावून सिन्नर महाविद्यालयाच्या शिरेपेचात मानाचा तुरा खाेवला आहे.

दरवर्षी मविप्रकडून संगीत,नाट्य, ललित कला, नृत्य या चार मुख्य कला प्रकारात एकूण १८ विविध स्पर्धा आयोजित केल्या जातात. यावर्षी या स्पर्धेत संस्थेच्या ५२ वरिष्ठ महाविद्यालयांनी सहभागी नोंदवला होता. प्राथमिक फेरी व अंतिम फेरी असे सलग चार दिवस चाललेल्या स्पर्धेत सिन्नर महाविद्यालयाने प्राथमिक फेरीत ८ कला प्रकरात प्रथम क्रमांक मिळवला होता. त्यानंतर अंतिम स्पर्धेत ६ कला प्रकारात सिन्नर महाविद्यालयाने बाजी मारली. महाविद्यालयाच्या कलावंत विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल तालुका संचालक कृष्णाजी भगत यांनी त्यांचे कौतुक केले. ग्रामीण भागातील विद्यार्थी कोणत्याही क्षेत्रात कमी नाही हे विद्यार्थ्यांनी सिद्ध केले आहे याचा सार्थ अभिमान वाटतो असे प्रतिपादन केले. प्राचार्य डॉ.पी. व्ही.रसाळ यांनीही विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक करत शाबासकीची थाप दिली.

गुणवत्तापूर्ण शिक्षण त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सांस्कृतिक स्पर्धेचे जीवनात मोलाचा वाटा असतो. कलावंत विद्यार्थ्यांनी प्रचंड मेहनत करत हे यश संपादन केले याचा सार्थ अभिमान वाटतो अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. उपप्राचार्य प्रा. आर. व्ही. पवार यांनी विद्यार्थ्यांच्या विविध अडचणीचे वेळोवेळी निराकरण करत त्यांना मार्गदर्शन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *