महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी महिला दिनानिमित्त नाशिककर महिलांसाठी विशेष उपक्रमाची घोषणा केली आहे. महिला सक्षमीकरणाच्या उद्देशाने महापालिकेच्या वतीने शहरात ‘स्मार्ट महिला हब’ स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.
या उपक्रमातून महिलांना डिजिटल साक्षरता आणि तंत्रज्ञान कौशल्य आत्मसात करण्याची संधी मिळणार आहे. तसेच, स्वयंरोजगार प्रशिक्षणासाठी अत्याधुनिक केंद्र उभारले जाणार आहे, ज्यामुळे महिलांना अर्थसाहाय्य आणि व्यावसायिक प्रगतीस चालना मिळेल.
नाशिकच्या नियोजनबद्ध विकासात आयुक्त खत्री यांचा महत्त्वाचा वाटा असून, त्यांनी महिलांच्या विकासाला प्राधान्य दिले आहे. प्रशासनातील महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण केले जात आहे. महिलांच्या सुरक्षेसाठी शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. तसेच, आरोग्य व शिक्षण क्षेत्रात महिलांसाठी विविध उपक्रम सुरू करण्यात आले आहेत. महिला व बालकल्याण विभागाच्या माध्यमातून महिलांच्या विकासासाठी योजना राबविल्या जात असून, निराधार विधवा, परित्यक्ता आणि घटस्फोटित महिलांच्या मुलींच्या विवाहासाठी प्रत्येकी एक लाखाचे अर्थसाहाय्य दिले जात आहे. आतापर्यंत ४०० महिलांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. तसेच, विधवा व निराधार मुलांसाठी शिष्यवृत्ती योजना असून, ४५०० लाभार्थींना मदत देण्यात आली आहे.