पोलिस मित्र वाढवा.. पोलिस गष्टवप्रभावी करा..

पोलिस मित्र वाढवा.. पोलिस गष्टवप्रभावी करा..

शुभम पार्क परिसरातील पोलीस नागरिक संवादात नागरिकांनी मांडल्या सूचना

प्रतिनिधी : नाशिक

नाशिक पोलीस आयुक्त संदीप करणे यांच्या आदेशान्वये शहरभरात सुरू असलेल्या पोलीस आयुक्त आपल्या दारी या उपक्रमांतर्गत सिडकोतील शुभम पार्क परिसरात बुधवारी पोलीस नागरिक संवाद कार्यक्रम पार पडला. शिवसेना शिंदे गटाच्या तसेच सामाजिक कार्यकर्त्या वंदना पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास माजी नगरसेवक डी. जी. सूर्यवंशी, माजी नगरसेविका छाया देवांग, सामाजिक कार्यकर्ते दिलीप देवांग, गोपीनाथ रोडे, संगीता बाविस्कर, छाया बिडलान, मीनाक्षी सूर्यवंशी आदींसह रहिवासी व ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक राकेश हांडे यांनी नागरिकांशी संवाद साधताना त्यांच्या तक्रारी जाणून घेतल्या. त्याचबरोबर परिसरात पोलीस गस्त वाढवण्याबरोबरच गुन्हेगारांचा बंदोबस्त करण्यासाठी उपाययोजना केल्या जात असल्याचेही त्यांनी सांगितले. यानंतर नागरिकांनी नागरी सुरक्षेसह पोलीस गस्त, सीसीटीव्ही कॅमेरे, पार्किंग, टवाळखोरांचा उद्रेक, कोयता गँगची दहशत आदी प्रश्नांकडे लक्ष घेतले. त्यावर कार्यक्रमास उपस्थित सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांनी नागरिकांना उत्तर देताना सांगितले की, कुठल्याही गुन्हेगारी घटना व आपत्कालीन स्थितीत नागरिकांनी तत्काळ 112 या क्रमांकवर तसेच पोलीस आयुक्तांच्या व्हाट्सअप क्रमांकावर संपर्क साधावा. नाशिक पोलिसांकडून पाच मिनिटांच्या आत कुठल्याही तक्रारदाराला प्रतिसाद दिला जात आहे त्यामुळे तातडीने या सेवेचा लाभ नागरिकांना होत असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच या परिसरातील उद्यान व मोकळ्या भूखंडांवर कुठल्याही प्रकारच्या अनुचित घटना व कायद्याचा भंग होत असल्यास पोलिसांना निर्भयपणे कळवावे कारवाई केली जाईल असे आश्वासनही देशमुख यांनी नागरिकांना दिले. दरम्यान आर्थिक फसवणूक, टवाळखोरांचा वावर, सायबर फसवणूक आदि घटनांबाबत नागरिकांनी सुरक्षा कशी बाळगावी याबाबतही त्यांनी मार्गदर्शन केले.
——–
पोलीस नागरिक सुसंवाद गरजेचा : वंदना पाटील

कार्यक्रम दरम्यान नागरिकांनी विशेषता महिलांनी आपल्या तक्रारी पोलिस अधिकाऱ्यांसमोर मांडल्या त्याचे निरसनही तातडीने पोलिसांकडून करण्यात आले त्यामुळे पोलीस नागरिकांमधील हा संवाद सेतू कायम राहावा यासाठी असे कार्यक्रम नियमित व्हावे असे मत सामाजिक कार्यकर्त्या वंदना पाटील यांनी व्यक्त केले. त्याचबरोबर अलीकडे घडलेल्या काही घटनांमध्ये पोलिसांनी दाखवल्या तत्परतेबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. तसेच नागरिकांनिही पोलिसांवर विश्वास ठेवून निर्भीडपणे तक्रारी मांडाव्यात असे आवाहन त्यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *