पॅन कार्ड २.० क्यूआर कोडमुळे गतिमान व अधिक सुरक्षित
पॅन कार्ड धारकांनी नवीन प्रणालीतील पॅन कार्ड २.० घेणे अधिक लाभदायक – सीए डॉ. दिलीप सातभाई
पॅन कार्ड २.० हा भारताच्या आयकर विभागाने सुरू केलेला एक परिवर्तनकारी उपक्रम असला तरी अनेक लोकांमध्ये याबाबत संभ्रम निर्माण होत आहे. जुने पॅन कार्ड निष्क्रिय होऊन बंद होणार का ? कि प्रत्येकाला डिजिटल पॅन कार्ड २.० प्रणालीनुसार नवीन पॅन कार्ड घ्यावे लागणार. याचबरोबर पॅन कार्ड २.० मध्ये नक्की काय बदल करण्यात आलेले आहेत. याबाबत पुणे येथील प्रसिद्ध आयकर कायदेविषयक तज्ञ यांनी सविस्तर माहिती देत सांगितले कि, सरकारने पॅन कार्ड २.० बाबत जी घोषणा केली आहे त्यानुसार पॅन कार्ड २.० हे अतिशय गतिमान व अधिक सुरक्षितता प्रधान करणारे असे पॅन कार्ड असणार आहे. ज्यामध्ये क्यूआर कोडचा समावेश आहे. QR कोड द्वारे जलद प्रतिसाद प्राप्त होणार असल्याने पॅन कार्ड बाबतची माहिती लगेचच उपलब्ध होणार असल्याने हा अतिशय महत्त्वपूर्ण बदल असून प्रत्येक पॅन कार्ड धारकांनी नवीन प्रणालीतील पॅन कार्ड २.० घ्यावे जेणेकरून तुमचे हि पॅन कार्ड हे आधुनिक पद्धतीचे असेल व तुमची सर्व माहिती अद्यावत राहील. यासोबतच सुधारित पॅन कार्ड फॉर्म मध्ये तुम्हाला तुमच्या नावामध्ये वडिलांच्या नावाआधी आईचे नाव समाविष्ट करता येणार आहे हा देखील महत्वपूर्ण बदल असून तुमच्या आईचे नाव समाविष्ट झाल्याने तुमची ती भविष्याची ओळख व काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
नवीन पॅन कार्ड २.० प्रणालीमध्ये सुरक्षा मजबूत करण्यासाठी आणि फसवणुकीचा प्रभावीपणे सामना करण्यासाठी अनिवार्य आधार लिंकेज, रिअल-टाइम डेटा व्हॅलिडेशन आणि प्रगत विश्लेषण यासारख्या प्रमुख सुधारणांचा समावेश आहे. पॅन २.० चे प्राथमिक उद्दिष्ट पूर्णपणे कागदविरहित, सुव्यवस्थित आणि तंत्रज्ञान-चालित प्रक्रियेकडे वाटचाल करून पॅन कार्ड प्रणालीला डिजिटली वाढवणे आहे. हा प्रकल्प सरकारच्या व्यापक डिजिटल इंडिया व्हिजनशी सुसंगत आहे; ज्याचे उद्दिष्ट सेवा वितरण सुधारणे, चांगली सुरक्षा सुनिश्चित करणे आणि करदात्यांना एक अखंड डिजिटल अनुभव प्रदान करणे आहे. पॅन कार्ड २.० हे मिळविण्यासाठी सरकारी संकेतस्थळावर निशुल्क मिळणार आहे. मात्र, इतर एजेन्सी द्वारे घेतल्यास किरकोळ खर्च लागू शकतो.