वित्तीय वर्ष २०२४-२५ करिता प्राप्तिकर रिटर्न (ITR) दाखल करण्याच्या प्रक्रियेस सुरवात झाली आहे. प्राप्तिकर रिटर्न भरण्यासाठी करदाते कागदपत्रांची जुळवाजुळव करताना दिसत आहे. मोठ्या रक्कमेचा पगार घेणारे पगारदार, उत्पन्न कामविणारे व्यक्ती कमीत कमी टॅक्स कसा भरता येईल यासाठीचे प्रयत्न करत असतात तर दुसरीकडे काही व्यक्ती करपात्र उत्पन्न नसल्याने किंवा कमावलेल्या उत्पन्नावर कर भरणा येतच नसेल तर प्राप्तिकर रिटर्न (ITR) का दाखल करावे, करण्याची गरज काय ? असे हि म्हणणारे आहेत. प्राप्तिकर रिटर्न (ITR) दाखल करणे म्हणजे सरकारला कर भरणा करणे असे नव्हे तर ते तुमच्या एकूण निव्वळ उत्पन्नावर आधारित असून करपात्र उत्पन्न नसल्यास अथवा करमुक्त उत्पन्न असल्यास तुम्ही शून्य (Nil) प्राप्तिकर रिटर्न दाखल करू शकतात. यामुळे उत्पन्न कामविणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने प्राप्तिकर रिटर्न भरणे आवश्यक तर आहेच त्याचबरोबर त्याचे विविध फायदे तुम्ही घेऊ शकतात.
प्राप्तिकरातील विविध बदल, दीर्घकालीन – अल्पकालीन भांडवली नफा, करदात्यांनी केलेली गुंतवणूक, करसवलत मिळवण्यासाठी करदात्याने घेतलेल्या वजावटी, याबाबत आता विस्तृत माहिती करदात्यांना द्यावी लागणार आहे या अनुषंगाने प्राप्तिकर रिटर्न (ITR) फॉर्म मध्ये देखील बदल करण्यात आल्याने वित्तीय वर्ष २०२४-२५ करिता प्राप्तिकर रिटर्न (ITR) दाखल करण्याची अंतिम मुदत ३१ जुलै वरून १५ सप्टेंबर करण्यात आली आहे. करदाते आता १५ सप्टेंबर पर्यंत प्राप्तिकर रिटर्न (ITR) दाखल करू शकणार आहे. मात्र, वेळेत दाखल न केल्यास लेट फी, दंड लागणार आहे.
प्राप्तिकर रिटर्न (ITR) दाखल केल्याने होणारे फायदे
-
प्राप्तिकर रिटर्न दाखल केल्याने तुमच्या उत्पन्नाचा कायदेशीर प्रबळ दस्तऐवज तयार होत असतो; जो तुम्ही उत्पन्नाचा पुरावा म्हणून वापर करू शकतात.
-
प्राप्तिकर रिटर्न मध्ये तुमच्या उत्पनाची सविस्तर माहिती प्रदान करत असते. यामुळे तुम्हाला कर्ज प्रकरण, विदेश यात्रा करण्यासाठी व्हिसा अशा बाबी करिता उपयोग होत असतो.
-
तुमच्या मुदत ठेवींवरील व्याज, भाडे उत्पन्न, कन्सल्टन्सी उत्पन्न किंवा पगार अशा उत्पन्नातून टॅक्स (टीडीएस) कापला कापला गेला आहे. परंतु, तुमच्यावर प्रत्यक्षात कोणतेही कर दायित्व नाही. अशा परिस्थितीत टीडीएस रक्कम परत मिळविण्यासाठी तुम्हाला प्राप्तिकर रिटर्न दाखल करणे गरजेचे आहे.
-
क्रेडिट कार्ड, गृह कर्ज, वैयक्तिक कर्ज याकरिता बँक तुमच्याकडे प्राप्तिकर रिटर्न ची मागणी करू शकते. जर ते तुमच्याकडे उपलब्ध असेल तर तुमचे पुढील काम सोपे होते.
-
शेअर बाजारातून, व्यवसायातून मिळणाऱ्या उत्पन्नातून कधी नुकसान होऊ शकते. हे नुकसान भविष्यातील वर्षांच्या उत्पन्नातून भरून काढले जाऊ शकते, ज्यामुळे तुमची कर देयता कमी होऊ शकते.
-
सरकारी निविदा मिळविण्याचा प्रयत्न करताना हे विशेषतः कंत्राटदारांसाठी, हे प्राप्तिकर रिटर्न वेळेवर दाखल करणे फार महत्वाचे आहे.
-
विमा कंपन्या अनेकदा अर्जदारांना त्यांच्या वार्षिक उत्पन्नाचा पुरावा म्हणून त्यांचे प्राप्तिकर रिटर्नची मागणी करते. कव्हरची रक्कम व्यक्तीच्या कमाईवर आधारित निश्चित केली जाते. प्राप्तिकर रिटर्न सादर केल्याने विमा कंपन्यांना व्यक्तीच्या उच्च उत्पन्न पातळीचे मूल्यांकन करण्यास मदत होऊन मोठ्या रक्कमेचा विमा मिळण्यास मदत होते.

(कर सल्लागार व ऑडिटर)
मो. ९८८१८४३६१७