शहरातील रस्ते खड्डे मुक्त होणार कधी
सिडको प्रतिनिधी:/ एकीकडे नाशिक स्मार्ट सिटी चा उहापोहो केला जात असला तरी प्रत्यक्षात मात्र नाशिक शहर हे खड्डेमय झाले आहे. नागरिकांना मूलभूत सुविधांसाठी पालिका प्रशासनाला वारंवार तक्रारी कराव्या लागत आहे.
ऐन पावसाळ्यात सुद्धा लोकांना पाण्याचा प्रश्न भेडसावत आहे तर दुसरीकडे शहरातील रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडलेले असून लोकांना जीव मुठीत धरून वाहने चालवावी लागत आहे तर खराब रस्त्यांमुळे वाहनधारकांना कमरेच्या, पाठीच्या मणक्याचे अशा अनेक प्रकारचे त्रास होत असून यामुळे लोकांचे आरोग्य धोक्यात येत आहे. अनेकदा तक्रारी करूनही महानगरपालिकेकडून खड्ड्यांबाबत ठोस उपाययोजना केली जात नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी दिसून येत आहे. आश्चर्याची बाब म्हणजे नवीन नाशिक विभागीय कार्यालयाच्या आजूबाजूचे रस्ते, पेलिकन पार्क येथील रस्त्यांची अनेक दिवसांपासून अक्षरशः चाळणी झालेली आहे तर काही ठिकाणी मोठं मोठे खड्डे पडलेले दिसून येत आहे.

मोठमोठ्या खड्ड्यांमुळे पायी चालणे मुश्किल नवीन सिडको भागातील सर्वच रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. पावसामुळे रस्त्या वर पाणी साचत आहे. यामुळे रस्ता कुठे व खड्डा कुठे हे लक्षात येत नसल्याने मुलांना शाळेत येण्या जाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. महापालिकेने किमान शाळांच्या मार्गातील रस्ते तरी व्यवस्थित करावी. – प्रिया सुरेश भोये, पालक
