नाशिकच्या अर्थकारणाला चालना देणारा कुंभमेळा
नाशिक मध्ये दर १२ वर्षांनी भरणाऱ्या कुंभमेळ्याला हिंदू परंपरेमध्ये विशेष महत्त्व आहे. लाखो करोडोच्या संख्येने भारतातूनच नव्हे तर देश, विदेशातून भाविक, पर्यटक या कुंभमेळात सहभागी होत असतात. हा केवळ धार्मिक उत्सव नसून या निमित्ताने मोठ्या प्रमाणावर आर्थिक उलाढाल होत असते. यासाठी प्रशासनाच्या वतीने वर्षा- दोन वर्षाआधीच कुंभमेळ्याचा आराखडा तयार करून केंद्रीय व राज्यसस्तरावर सरकारकडून कोट्यवधी रुपयांचे अंदाजपत्रक तयार केले जाते. त्याचे योग्य नियोजन करून शहराच्या विकासाबरोबरच भाविकांना सेवा, सुविधा पुरविण्यावर भर दिला जातो.
कुंभमेळ्याचे ऐतिहासिक महत्त्वही फार मोठे आहे त्यामुळे भारतातीलच नव्हे तर अवघ्या देशभरातले भाविका कुंभमेळासाठी अतुर असतात. भारताची सध्याची लोकसंख्या पाहिली तर १४० कोटींच्या आसपास आहे. या लोकसंख्येच्या १० टक्के लोक नाशिकमधील कुंभमेळ्यात सहभागी होतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे. या कुंभमेळ्यात कोट्यवधी लोक सहभाग नोंदवून रोकॉर्डब्रेक गर्दी होईल असे देखील वाटत आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात सगळे लोक एका ठिकाणी जमणार म्हणजे आर्थिक व्यवहार आलेच, लोकांच्या राहण्यापासून खाण्यापासून ते येण्या-जाण्यापर्यंतचा सर्व खर्च आणि त्याच्याशी संबंधित सगळी उलाढाल आलीत. लोकांच्या सेवा आणि सुविधांसाठी रस्ते, सुरक्षा, राहण्यासाठीची व आरोग्याची सुविधा या कारणासाठी महाराष्ट्र सरकार व केंद्र सरकारकडून कोट्यवधी रुपयांचा निधी भेटणार असला तरी, या कुंभमेळातून सरकारलाही महसूल स्वरूपात मोठे उत्पन्न प्राप्त होणार आहे.
नाशिक शहराचा मोठा इतिहास असून आध्यत्मिक, सांस्कृतिक व धार्मिक तीर्थक्षेत्र म्हणून देशात ओळख जाते. याचबरोबर पुणे – नाशिक – मुंबई – या त्रिवेणी संगमात नाशिक देखील विकासाच्या दृष्टीने प्रगतीपथावर आहे. यामुळे भारतासह जगभरातल्या विविध कंपन्या इथे मार्केटिंग साठी उत्सुक असतात व मोठ्या प्रमाणात पैशांची गुंतवणूक करतात. परंतु, खऱ्याअर्थाने कुंभमेळ्यातील ही आर्थिक उलाढाल कशी असेल सरकारकडून जाहीर झालेल्या बजेट मधून काय योजना पुरवल्या जाणार आहेत. सरकारला या सगळ्यातून कसे व किती उत्पन्न मिळेल हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
मागील इतिहास बघितला तर कुंभमेळामध्ये श्रद्धा आणि व्यापारी यांचाही मेळ होताना बघायला मिळते. कुंभमेळ्याने लोकांसाठी रोजगार निर्मिती होते, कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असल्याने अर्थव्यवस्थेलाही मोठा हातभार लावला जातो. कुंभमेळातून सरकारला टॅक्स रुपी, वस्तू व सेवांच्या माध्यमातून मोठा महसूल प्राप्त होतो. याच पार्श्वभूमीवर स्वच्छता, सुरक्षा आणि भाविकांच्या पायभूत सुविधांसाठी महाराष्ट सरकारकडून मोठा निधी मिळत असल्याने शहराच्या विकासाचा कायापालट पाहण्यास मिळतो. यासाठी सरकारकडून कुंभमेळासाठी कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक करण्यात येते.
कुंभमेळा केवळ एक धार्मिक कार्यक्रम नाही, तर ते एक मोठे आर्थिक इंजिन आहे असे म्हटले जाते. या कुंभमेळ्यामुळे स्थानिक आणि राष्ट्रीय अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळते. कुंभमेळात खाण्यापासून राहण्यापर्यंत ते पूजेसाठी लागणारी फुलं आणि पूजेच्या साहित्यापर्यंत सगळ्या गोष्टीतून सरकारच्या उत्पन्न वाढीला आणि पर्यायाने भारताच्या अर्थव्यवस्थेला चालना देणाऱ्या आहे. राज्य व केंद्र सरकारला उत्पन्न मिळवून देणारे महत्वाचे स्रोत आहे असे म्हणायला हरकत नाही.
कुंभमेळ्याचा अर्थकारणावर म्हणजेच अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम
सरकारी उत्पन्नात मोठी वाढ – कुंभमेळ्यामध्ये येणारे लाखो करोडो भाविकांचा राहण्याचा, खाण्यापिण्याचा खर्च जितका जास्त तितके सरकारला जीएसटी कराच्या माध्यमातून उत्पन्न वाढ होणार आहे.
भाडेतत्वावरील जमीन – व्यावसायिक, व्यापारी, खाजगी कंपन्या त्यांच्या व्यवसायासाठी सरकारकडून, स्थानिक प्राधिकरणाकडून, प्रशासनाकडून, जमिनी भाड्याने दिल्या जातात यातून साकारला उत्पन्न मिळणार आहे.
इतर सोर्स – सरकारला पैसे कमवून देणारा इतर सोर्स म्हणजे कुंभमेळ्यात ठिक ठिकाणी आपली दुकान लावणाऱ्या लोकांना दुकान मांडण्याचा परवाना, लायसन्स घ्यावे लागतात. फेरीवाले, विविध कला गुणाचे प्रदर्शन भरविणारे कलाकार असतील किंवा छोटे-मोठे व्यापारी असतील याचबरोबर स्थानिक प्रवास तिकेट्स, पार्किंग आणि मेंटेनन्स अशा सेवांचे चार्जेस त्यातूनही सरकारला फायदा होऊन सरकारी तिजोरीत वाढ होणार आहे.
नव-नवीन व्यवसाय व रोजगाराच्या संधी – कुंभमेळ्यादरम्यान लाखो भाविक, पर्यटक देशाच्या कान्याकोपऱ्यातून येत असतात त्यांच्या येण्याजाण्याच्या पासून ते राहण्यापर्यंतच्या विविध गरजांसाठी वस्तू आणि सेवांची खरेदी करतात, ज्यामुळे स्थानिक व्यवसाय आणि रोजगाराच्या अनेक संधी निर्माण होतात. हजारो कुटुंबांना नवनवीन व्यवसायाच्या संधी निर्माण होऊन रोजगार मिळेल. याचा फायदा केवळ नाशिक शहरातील लोकांनाच होईल असं नाही तर महाराष्ट्रातील व महाराष्ट्राबाहेरील व्यवसायिकांना देखील होईल.
पर्यटनाला चालना – कुंभमेळ्यामुळे पर्यटनाला मोठी चालना मिळते. भाविक विविध ठिकाणांहून कुंभमेळ्या करिता येतात, त्यामुळे केवळ कुंभमेळा येथेच नव्हे इतर हि धार्मिक व पर्यटन स्थळांना भाविक भेट देतात. ज्यामुळे हॉटेल, वाहतूक आणि इतर पर्यटन-संबंधित व्यवसायांना मोठा आर्थिक फायदा होऊन अर्थकारणाला चालना मिळते.
पायाभूत सुविधांचा विकास – महाकुंभमेळ्याच्या तयारीसाठी सरकार मोठ्या प्रमाणात नागरिकांकरिता पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक करते, जसे की दळणवळणसाठी रस्ते, एअरपोर्ट, पूल, पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्यसंबंधीच्या उपाययोजना, पार्किंग अशा अनेक महत्वपूर्ण बाबी विचारात घेऊन कुंभमेळ्यामुळे शहराच्या पायाभूत सुविधांचा विकास होण्यास मदत होऊन अर्थकारणाला चालना मिळते.
देशाच्या जीडीपी मध्ये वाढ – कुंभमेळ्यामुळे खर्च, गुंतवणूक आणि उत्पन्नाचे चक्र हे अधिक गतिमान होऊन लाखो, करोडो रुपयांची उलाढाल होत असल्याने एकंदरीतच देशाच्या जीडीपी मध्ये वाढ होण्यास मदत होते.