सेवानिवृत्त न्यायाधीश व प्राध्यापकांच्या घरफोडीप्रकरणी दोन चोरटे गजाआड; तीन लाखांचा मुद्देमाल जप्त
नाशिक | दि. २९ जुलै २०२५
नाशिकमध्ये सेवानिवृत्त न्यायाधीश आणि प्राध्यापकांच्या बंद घरांना लक्ष्य करून चोरी करणाऱ्या दोघा संशयितांना नाशिक रोड पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली आहे. जॉय ऊर्फ भुऱ्या विजय नानाजी (२६) आणि चेतन कैलास सोनवणे (दोघे रा. शरणपूर वसाहत, कॅनडा कॉर्नर) अशी अटकेत आलेल्या आरोपींची नावे असून, त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून तीन लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पंधरवड्यापूर्वी चेहडी पंपिंग, मंगलमूर्ती अपार्टमेंटमध्ये राहणारे सेवानिवृत्त न्यायाधीश रवींद्रनाथ गांगुर्डे यांच्या बंद घरात चोरी झाली होती. अज्ञात चोरट्याने घरातून २० हजारांची रोकड लंपास केली होती.
त्यानंतर तिडके कॉलनीतील गायकवाडनगर येथे राहणाऱ्या सेवानिवृत्त प्राध्यापिका ज्योती कुलकर्णी यांच्या बंद घराची तोडफोड करत चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने व मोबाइल चोरून नेले. या दोन्ही घटनांप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल करण्यात आले होते.
गुन्ह्याचा तपास सुरू असताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी, उपनिरीक्षक संदीप पवार, विशाल पाटील, विष्णू गोसावी, अविनाश देवरे, महेंद्र जाधव, सागर आडणे, रोहित शिंदे, अरुण गाडेकर, योगेश रानडे यांच्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे सिन्नर फाटा भागात सापळा रचून दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले.
चौकशीत आरोपींनी दोन्ही घरफोडीचे गुन्हे केल्याची कबुली दिली असून, त्यांच्याकडून चोरी केलेल्या सोन्या-चांदीचे दागिने, मोबाइल आणि रोकड मिळून सुमारे तीन लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे.