राष्ट्रसंत भगवानबाबा जयंती निमित्त अभिवादन
बाळासाहेब घुगे, डॉ मंजुषा दराडे यांनी भगवानबाबा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
सिडको प्रतिनिधी:/ वंजारी समाजाचे आद्यपुरुष मानले जाणारे राष्ट्रसंत भगवानबाबांनी महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात कीर्तनाच्या माध्यमातून शैक्षणिक, सामाजिक, नैतिक व सांस्कृतिक प्रबोधन केले. भक्तिमार्ग, कर्ममार्ग व ज्ञानमार्ग यांचा त्रिवेणी समन्वय त्यांनी साधला होता. तो त्यांच्या कीर्तनातही दिसून येत. कीर्तनकार म्हणून त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळाली होती.
भगवान बाबा यांनी आपल्या कीर्तनांतून जातिभेद, धर्मभेद, अज्ञान, अंधश्रद्धा, अनिष्ट रुढी-परंपरा यांच्यावर प्रहार करीत. प्रबोधनकार्यासाठी त्यांनी मराठवाडा, विदर्भ, तेलंगणा, आंध्रप्रदेश, कर्नाटकातील काही भाग व पश्चिम महाराष्ट्रासह उभा महाराष्ट्र पिंजून काढला. त्यामुळेच वारकरी धर्माला आधुनिक रूप देणारे संत म्हणून त्यांना ओळखले जाते. विठूनामाचा प्रचार करतानाच त्यांनी समता, बंधुता, एकता, मानवता यांसारख्या आधुनिक विचारांचा आयुष्यभर प्रचार करतानाच शिक्षणाचे महत्त्व पटवून देताना मुलांना अधिकाधिक शिक्षणाची आवड निर्माण करा, उच्च शिक्षण द्या यासाठी ते कायम प्रबोधन करत असल्याची माहिती यावेळी भाजपा दिव्यांग विकास आघाडीचे उत्तर महाराष्ट्र प्रभारी बाळासाहेब घुगे यांनी दिली.
तसेच बाळासाहेब सोनवणे व प्रकाश चकोर यांनी भगवान बाबा यांच्या अध्यात्मिक व सामाजिक कार्याविषयी माहिती देत भगवान बाबा यांचे संस्कार घराघरात पोहोचावे अशी भावना यावेळी व्यक्त केली. कार्यक्रमास समाज बांधव व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहिल्याबद्दल विलास सानप यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बाळासाहेब, सोनवणे, प्रकाश चकोर, संजय घुगे, दिलीप देवांग, प्रविण मोरे, शशी सोनवणे, कृष्णा मामा काळे, रोहन कानकाटे, भगवान बरके, योगेश कातकाडे, दशरथ गांगुर्डे यासह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.