पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मोठी घोषणा!
“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात लाल किल्ल्यावरून मोठी घोषणा केली की, यावर्षी दिवाळीत एक मोठी भेट मिळणार आहे. आम्ही पुढच्या पिढीतील जीएसटी सुधारणा आणत आहोत. त्यामुळे व्यवसाय, उद्योगांना मोठे फायदे मिळतील. सामान्य लोकांसाठी कर कमी होऊन दैनंदिन वापराच्या वस्तू स्वस्त होतील, लोकांना खूप फायदा होईल. ज्यामुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळेल. प्रत्यक्षात, सर्वसामान्यांना लोकांना फायदा होणार कि या नवीन कर रचनेमुळे सरकारच्या तिजोरीत अधिक उत्पन्न वाढणार आहे हे जाणून घेणे महत्वाचे असणार आहे”.
भारतात एक देश एक कर आधारित ‘वस्तू व सेवा कर’ अर्थात जीएसटीचे ५%, १२%, १८% आणि २८% असे ४ स्लॅब आहेत. या ४ स्लॅब पैकी १२% आणि २८% जीएसटी स्लॅब रद्द करून केवळ २ स्लॅब करण्यात यावे याकरिता जीएसटी परिषदेच्या मंत्र्यांच्या गटाने जीएसटीच्या ५% आणि १८% स्लॅबना मान्यता दिली आहे. लक्झरी वस्तू ४०% च्या ब्रॅकेटमध्ये येतील. केंद्र सरकारच्या प्रस्तावाला पाठिंबा दिला आहे, जो १२% आणि २८% च्या जीएसटी स्लॅब रद्द करण्याबाबत स्पष्ट केले आहे. केंद्राच्या प्रस्तावांवर सर्वांनी आपापल्या सूचना दिल्या. काही राज्यांनीही काही आक्षेप घेतले ते जीएसटी कौन्सिलकडे पाठवण्यात आले आहे जे त्यावर निर्णय घेईल. अशी माहिती जीओएमचे संयोजक सम्राट चौधरी यांनी दिली.
लवकरच नवीन दर लागू होतील
जीएसटी परिषदेच्या पुढील बैठकीत जीएसटी परिषदेसमोर आता जीएसटीच्या शिफारशी मांडल्या जातील. अशा मोठ्या बदलांवरील निर्णय जलद गतीने घेतल्याने ही बैठक लवकरच होण्याची शक्यता आहे. नवीन दर कधी लागू होतील याची तारीख निश्चित केली जाईल आणि व्यवसाय/ग्राहकांना आगाऊ माहिती दिली जाईल जेणेकरून ते तयार राहू शकतील.
सर्व राज्ये परिषदेत त्यांचे विचार मांडतील. काही राज्यांनी आधीच काही आक्षेप घेतले आहेत. या आक्षेपांवर चर्चा केली जाईल आणि सर्वांना सहमती देण्याचा प्रयत्न केला जाईल. जर परिषदेने हा प्रस्ताव ७५% बहुमताने मंजूर केला तर केंद्र आणि राज्य सरकार त्याची अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक कायदेशीर आणि तांत्रिक पावले उचलतील.
दैनंदिन वापराच्या वस्तू स्वस्त होणार
– जीएसटी कर १२% वरून ५% पर्यंत कमी केला जाईल. त्यामुळे सुका मेवा, ब्रँडेड नमकीन, टूथ पावडर, टूथपेस्ट, साबण, केसांचे तेल, सामान्य प्रतिजैविक, वेदनाशामक औषधे, प्रक्रिया केलेले अन्न, स्नॅक्स, गोठवलेल्या भाज्या, कंडेन्स्ड मिल्क, काही मोबाईल, काही संगणक, शिलाई मशीन, प्रेशर कुकर, गीझर यासारख्या वस्तू स्वस्त होतील.
– याशिवाय, नॉन-इलेक्ट्रिक वॉटर फिल्टर, इलेक्ट्रिक इस्त्री, व्हॅक्यूम
क्लीनर, १,००० रुपयांपेक्षा जास्त किमतीचे तयार कपडे, ५००-१,००० रुपयांमधील शूज, बहुतेक लसी, एचआयव्ही/टीबी डायग्नोस्टिक किट, सायकली आणि भांडी यावरही कमी दराने कर आकारला जाईल.
– भूमिती बॉक्स, नकाशे, ग्लोब, ग्लेझ्ड टाइल्स, प्री-फॅब्रिकेटेड इमारती, व्हेंडिंग मशीन, सार्वजनिक वाहतूक वाहने, कृषी यंत्रसामग्री, सौर वॉटर हीटर यासारख्या उत्पादनांचा समावेश १२% कर स्लॅबमध्ये होतो. दोन स्लॅबच्या मंजुरीनंतर, यावर ५% कर आकारला जाईल.
जीएसटी कर २८% वरून १८% पर्यंत कमी केल्यास या वस्तूही स्वस्त होतील
सिमेंट, सौंदर्य उत्पादने, चॉकलेट, रेडी-मिक्स काँक्रीट, टीव्ही, रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशीन, एसी, डिशवॉशर, खाजगी विमान, प्रथिने सांद्रता, साखरेचा पाक, कॉफी सांद्रता, प्लास्टिक उत्पादने, रबर टायर, ॲल्युमिनियम फॉइल, टेम्पर्ड ग्लास, प्रिंटर, रेझर, मॅनिक्युअर किट, डेंटल फ्लॉस.
आरोग्य आणि जीवन विम्याचा हप्ता होणार कमी
आरोग्य आणि जीवन विमा यावरील जीएसटी माफ व्हावा यासाठी आम्ही अनेक वर्षांपासून प्रयत्न करत आहोत यासंदर्भात वेळोवेळी आमच्या संस्थेच्या माध्यमातून निवेदन देखील दिलेले आहेत. आरोग्य आणि जीवन विमा यावरील जीएसटी माफ करण्याच्या प्रस्तावावर मंत्रिगटाच्या बैठकीत चर्चा झाली. यामध्ये वैयक्तिक आरोग्य विमा आणि जीवन विम्यावरील प्रीमियमवर जीएसटी माफ करण्याचाबाबत चर्चा झाली. जर हा प्रस्ताव मान्य झाला तर आरोग्य आणि जीवन विमा पॉलिसीवर थेट परिणाम होईल. विमावरील जीएसटी माफ होणार ही खरोखरच दिलासादायक बाब आहे. सध्या यावर १८ टक्के जीएसटी आकारला जातो जो सर्वसामान्य लोकांच्या आवाक्या बाहेर आहे. – योगेश भास्कर कातकाडे (कर सल्लगार व प्रमाणित लेखापरीक्षक)