वादग्रस्त पत्रकामुळे नाशिकमध्ये तणाव, पोलिसांनी तातडीने कारवाई केल्याने परिस्थिती नियंत्रित
नाशिक प्रतिनिधी : दलित समाजविरोधी पत्रक तयार करून ते राजवाडा परिसरात फेकल्याने दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या आक्षेपार्ह पत्रकामुळे दोन समाजाता तेढ निर्माण होण्याची भीती होती; मात्र पोलिसांनी तातडीने कारवाई करत मुख्य आरोपीला ताब्यात घेण्यात यश आल्याने परिस्थिती नियंत्रित करता आली.
या पत्रकावर एका व्यक्तीचे नाव प्रसिद्ध करण्यात आले होते; मात्र फोटोमधील व्यक्तीचा या घटनेशी काहीही संबंध नसल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणातील मुख्य आरोपीने तयार केलेल्या पत्रकामधून दोन समाजांत जातीय तेढ निर्माण करण्याचा उद्देश नसून, केवळ वैयक्तिक वादातून या पत्रकात नाव आलेल्या व्यक्तीला त्रास व्हावा, याच उद्देशाने पत्रके तयार करून टाकण्यात आली असल्याची माहिती समोर येत आहे.
या पत्रकामुळे पंचवटीत मोठा जमाव गोळा झाला. दिंडोरी नाका आणि निमाणी बस स्टँड परिसरात झेंडे व फलकबाजी करून आंदोलन करण्यात आले; त्यानंतर घोषणाबाजी करण्यात आली. सामाजिक कार्यकर्ते, पोलिसांनी हस्तक्षेप करुन शांतता निर्माण केली.
याप्रकरणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हा अध्यक्ष प्रकाश लोंढे, सामाजिक कार्यकर्ते दीपक डोके, अर्जुन पगारे, प्रशांत जाधव यांनी पोलिस स्थानकात तक्रार दिली. पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी केल्यानंतर वैयक्तीक वादातून अद्दल घडवण्यासाठी हा प्रकार केल्याचे समोर आले आहे.