सिडकोत महापालिकेची अतिक्रमण विरोधी कारवाई
_अनधिकृत शेड, बांधकाम जमीनदोस्त! टपऱ्यांसह दोन ट्रक साहित्य जप्त_
सिडको प्रतिनिधी : महापालिकेच्या सिडको अतिक्रमण विभागाच्या वतीने पाथर्डी फाटा, गरवारे ते एक्सलो पॉईंट परिसरात असलेले अनधिकृत व्यवसाय बांधकाम, शेड, हातगाडी, फळ विक्रेते व टपऱ्या, दुकानांसमोरली शेड अतिक्रमण काढण्यात आले. कारवाईदरम्यान काही व्यावसायिकांनी या मोहिमेस विरोध करीत गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला, परंतु पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत हा वाद मिटविला. दुकानांसमोर मुख्य रस्त्यालगत करण्यात आलेली सर्व अनधिकृत बांधकामे व शेड जेसीबीच्या सहाय्याने हटवण्यात आली. यामुळे परिसरातील रस्ते मोकळे होऊन वाहतूक सुरळीत झाली. या मोहिमेत सुमारे २५ ते ३० टपऱ्या जमीनदोस्त करण्यात येऊन दोन ट्रक साहित्य जप्त करत आडगाव येथील गोडाऊन मध्ये पाठवण्यात आले आहे.
यापुढेही कारवाई सुरूच राहणार…
महापालिका प्रशासनाकडून व्यवसायिकांना स्पष्ट इशारा देण्यात आला आहे की, परवानगीशिवाय उभारलेली कोणतीही बांधकामे वा शेड यांना स्थान दिले जाणार नाही. भविष्यात पुन्हा अतिक्रमण केल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
महापालिकेच्या आयुक्त मनीषा खत्री, अतिक्रमण विभाग उपायुक्त सुवर्णा दखणे यांच्या आदेशानुसार व नवीन नाशिक विभागीय अधिकारी जयश्री बैरागी यांच्या मार्गदर्शनाखाली या कारवाई दरम्यान नवीन नाशिक अतिक्रमण विभाग प्रमुख निखिल तेजाळे व मेहुल दवे निवृत्ती कापडणे रवींद्र काथवटे प्रकाश नाठे व वाहन चालक सुनील हिरे यांच्यासह अतिक्रमण पथकातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.