शिंदे गटाचे नगरसेवक प्रवीण तिदमे महानगर प्रमुख आणि नगरसेवक पदाचा सोमवारी देणार राजीनामा

शिंदे गटाचे नगरसेवक प्रवीण तिदमे महानगर प्रमुख आणि नगरसेवक पदाचा सोमवारी देणार राजीनामा

नाशिक : प्रतिनिधी :/ मा. एकनाथजी शिंदे साहेबांवर जेंव्हा अन्याय झाला तेंव्हा नाशिक मधून माझ्या राजकीय भविष्याची चिंता न करता नाशिक मधून मी सर्वप्रथम शिंदे साहेबांसोबत गेलो.

नाशिकमध्ये शिवसेनेचा काळ अत्यंत कठीण असताना, कोणतीही अट-शर्त न ठेवता आणि कोणताही राजकीय सौदा न करता मी सर्वप्रथम पुढे येऊन शिवसेनेत प्रवेश केला. उबाठा गटाशी थेट संघर्ष करत, अनेक शिवसैनिक सोबत घेत संघटना उभी केली. पक्षकार्यासाठी पूर्णवेळ देता यावा म्हणून नोकरीसुद्धा सोडली.

सात वर्षांपासून असलेले म्युनिसिपल कर्मचारी सेनेचे अध्यक्षपद आणि नाशिक महानगरपालिकेत असलेल्या केबिनचा पण त्याग केला.

शाखा प्रमुख म्हणून गल्लीतून सुरुवात करून उपविभाग प्रमुख, विभाग प्रमुख, उप-महानगर प्रमुख, नाशिक पश्चिम विधानसभा प्रमुख आणि पुढे महानगर प्रमुख असा संपूर्ण संघर्षाचा प्रवास मी पदासाठी नव्हे, तर शिवसेना वाढवण्यासाठी केला. विधानसभा व लोकसभा निवडणुकांमध्ये उमेदवार कोणाचाही असो, शिवसेनेचा झेंडा खांद्यावर घेऊन आघाडी घेतली.

माझ्या महानगर प्रमुख पदाच्या कार्यकाळात नाशिक शहरात नगरविकास निधीतून ३०० कोटींपेक्षा अधिक विकासकामे मार्गी लावली. नगरविकास निधी काय असतो हे तेंव्हा नाशिकला माहीत झाले.

स्वतःच्या प्रभागापुरते मर्यादित न राहता, इतर नगरसेवकांच्या प्रभागासाठी निधी मिळावा यासाठी मी सातत्याने धावपळ केली.

पण, आज निष्ठावंत व संघर्ष करणाऱ्या शिवसैनिकांवर अन्याय होत असल्याची भावना निर्माण झाली आहे.

एक वर्षे निगोसिएशन करून पक्षात आलेल्या अजय बोरस्ते यांना एकाच वेळी—

जिल्हा प्रमुख,

उपनेते, शिवसेना,

अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे पद,

नाशिक महापालिका गटनेते

अशी चार महत्त्वाची पदे देण्यात आली.

त्यानंतरही अजय बोरस्ते यांनी सतत मीडियात बातम्या पेरल्या की, कार्यकारिणी बदलणार, महानगरप्रमुख बदलणार, सोशल मीडियावर पक्षाबद्दल संभ्रम कायम ठेवला. त्यामुळे, अनेक पक्ष प्रवेश ही थांबले. पण, कुणीच लक्ष दिले नाही.

तसेच, दीड-दोन वर्षांनंतर पक्षात प्रवेश केलेल्या विलास शिंदे यांना—

सह-संपर्कप्रमुख, नाशिक आणि आता

उपमहापौर, नाशिक

अशी दोन पदे देण्यात आली.

एकीकडे संघर्ष, निष्ठा आणि संघटन उभारणी करणाऱ्या शिवसैनिकांना डावलले जात आहे आणि दुसरीकडे सौदेबाजी करून आलेल्यांना पदांची खैरात होत आहे, यामुळे पक्षातील अनेक प्रामाणिक कार्यकर्त्यांमध्ये तीव्र असंतोष आहे.

या अन्यायाच्या पार्श्वभूमीवर,

सोमवारी मी शिवसेना नाशिक महानगर प्रमुख पदाचा राजीनामा पक्ष नेते मा. एकनाथजी शिंदे साहेब व मा. खा. डॉ. श्रीकांत शिंदे साहेब यांच्याकडे सादर करणार आहे. तसेच नगरसेवक पदाचा राजीनामा दुपारी ४.३० वाजता मा. नाशिक महानगरपालिका आयुक्त यांच्याकडे सादर करणार आहे.

– प्रविण (बंटी) तिदमे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *