नाशिक (प्रतिनिधी) : नाशिक शहर पोलीस दलाच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येत असलेल्या ‘पोलीस आयुक्त कार्यालय प्रत्यक्ष पाहणी (Walk in Tour of Nashik City Police)’ या अभिनव उपक्रमाला विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. दि. १७ फेब्रुवारी २०२६ रोजी त्र्यंबकेश्वर रोडवरील प्राईसलेस पर्ल्स स्कॉलर अकॅडमीच्या सुमारे ५० विद्यार्थ्यांनी पोलीस आयुक्तालयाला भेट देत पोलिसांच्या विविध शाखांचे काम प्रत्यक्ष अनुभवले. विद्यार्थ्यांमध्ये पोलीस दलाविषयी सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करणे, प्रशासनाची कार्यपद्धती समजावून सांगणे तसेच कायदा व सुव्यवस्थेच्या व्यवस्थापनामागील शिस्त आणि जबाबदारीची जाणीव करून देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. शालेय जीवनातच नागरिक म्हणून कर्तव्य आणि जबाबदाऱ्या समजाव्यात, यासाठी हा ‘फ्रेंडली पोलिसिंग’चा पुढाकार घेण्यात आला आहे.

भेटीदरम्यान विद्यार्थ्यांनी खालील विभागांना भेट देऊन सविस्तर माहिती जाणून घेतली:
-
नियंत्रण कक्ष व डायल ११२ सेवा: आपत्कालीन कॉल कसे स्वीकारले जातात, त्यानंतर संबंधित पोलीस ठाण्यांशी कसा समन्वय साधला जातो आणि काही मिनिटांत मदत कशी पोहोचवली जाते, याचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले.
-
पासपोर्ट व चारित्र्य पडताळणी विभाग: नागरिकांच्या अर्जांची छाननी, कागदपत्रांची पडताळणी आणि स्थानिक चौकशी प्रक्रिया कशी केली जाते, याची माहिती देण्यात आली.
-
सायबर क्राईम शाखा: ऑनलाईन फसवणूक, सोशल मीडियावरील गुन्हे, सायबर सुरक्षा आणि डिजिटल व्यवहार करताना घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांना सुरक्षित इंटरनेट वापराचे महत्त्व पटवून देण्यात आले.
-
वाहतूक शाखा: ट्रॅफिक कंट्रोल रूममधील सीसीटीव्ही यंत्रणा, सिग्नल प्रणाली, ई-चलान प्रक्रिया आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कसा केला जातो, याची माहिती देण्यात आली. वाहतूक नियमांचे पालन केल्यास अपघात कसे टाळता येतात, यावर विशेष भर देण्यात आला.
यावेळी पोलीस उपायुक्त मा. किरिथिका सी.एम. यांनी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधला. “पोलीस दलात करिअर करण्यासाठी कोणती तयारी करावी?”, “आपत्कालीन प्रसंगी नागरिकांनी काय करावे?” अशा विविध प्रश्नांना त्यांनी समर्पक उत्तरे दिली. त्यांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साह आणि आत्मविश्वास वाढल्याचे दिसून आले.
कार्यक्रमास सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीमती अद्विता शिंदे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. आचल मुदगल, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. युवराज पत्की तसेच शाळेच्या संस्थाचालक श्रीमती पर्ल मोतीवाला आझादी उपस्थित होत्या.
“अशा उपक्रमांमुळे पोलीस आणि विद्यार्थी यांच्यातील संवाद वाढून परस्पर विश्वास दृढ होतो. आज विद्यार्थ्यांनी खाकी वर्दीमागील शिस्त, तत्परता आणि जबाबदारी जवळून अनुभवली,” असे मत पोलीस प्रशासनाने व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शिक्षक केतकी जाधव, श्रीमती साजिया शेख आणि श्री. आनंद इंगळे यांनी विशेष परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांनीही हा अनुभव ‘प्रेरणादायी आणि ज्ञानवर्धक’ असल्याचे सांगितले. पोलिसांच्या या अभिनव पुढाकाराचे पालक व शैक्षणिक क्षेत्रातूनही कौतुक होत आहे.