इंदिरानगर / नाशिक: वडाळागाव येथील जलकुंभाच्या मुख्य ६०० मिमी पंपिंग लाईनला मागील तीन महिन्यांपासून भीषण गळती लागली असून रोज लाखो लिटर शुद्ध पाणी रस्त्यावर वाया जात आहे. यासंदर्भात महापालिकेकडे वारंवार लेखी व तोंडी तक्रारी करूनही प्रशासनाकडून कोणतीही कारवाई न झाल्याने, संतप्त स्थानिक नागरिकांनी गळतीच्या पाण्यातच वाहने धुवून अनोखे ‘गांधीगिरी’ आंदोलन केले. मिळालेल्या माहितीनुसार, वडाळागाव जलकुंभालगत असलेल्या मुख्य जलवाहिनीच्या वॉल्वमधून गेल्या तीन महिन्यांपासून पाण्याचा मोठा अपव्यय होत आहे. नागरिकांनी महापालिकेचा टोल-फ्री क्रमांक, ॲप तसेच स्थानिक अधिकाऱ्यांकडे अनेकदा तक्रारी नोंदवल्या. प्रत्येक वेळी ‘उद्या काम होईल’ असे आश्वासन दिले गेले, मात्र ३ महिने उलटूनही एकाही अधिकाऱ्याने किंवा कर्मचाऱ्याने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली नाही.
प्रशासनाच्या या उदासीन कारभाराला कंटाळून स्थानिक रहिवासी रमीज पठाण, ईश्वर पवार आणि इतर युवकांनी रस्त्यावर वाहणाऱ्या पाण्यात वाहने धुवून मनपा प्रशासनाचा तीव्र निषेध नोंदवला. आयुक्त दालनात पाणी ओतण्याचा इशारा या दुर्लक्षाबाबत ‘वडाळागाव युवा मंच कृती समिती’ने आक्रमक भूमिका घेतली आहे. येत्या २४ तासांत ही जलवाहिनी दुरुस्त न झाल्यास गळतीचे पाणी बादल्यांमध्ये भरून थेट मनपा आयुक्तांच्या दालनात नेऊन ओतण्याचा इशारा समितीने दिला आहे. तसेच, तीन महिन्यांत वाया गेलेल्या लाखो लिटर पाण्याच्या नासाडीची भरपाई जबाबदार अधिकाऱ्यांच्या पगारातून वसूल करण्यात यावी, अशी जोरदार मागणीही रहिवाशांनी केली आहे.
