प्रतिनिधी : गडवाट परिवाराने दरवर्षीप्रमाणे यंदाही शिवजयंती अत्यंत आदर्श, संस्कारप्रधान आणि ऐतिहासिक जाणीव जागवणाऱ्या पद्धतीने साजरी करत सामाजिक बांधिलकीचा वेगळा आदर्श निर्माण केला. दिवंगत गडवाटकरी कै. दर्शन विनायक झनकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्यांच्या मूळ गावातील शाळेत विद्यार्थ्यां, ग्रामस्थ आणि गडवाटकर्यांच्या उपस्थितीत हा सोहळा उत्साहात पार पडला. दर्शन यांच्या कार्याची पावती म्हणून त्यांच्या गावातच शिवजयंती साजरी करण्यात आल्याने कार्यक्रमाला विशेष भावनिक स्वरूप लाभले.
सोहळ्याची सुरुवात छत्रपतींच्या पालखीच्या भव्य मिरवणुकीने झाली. ढोल-ताशांच्या गजरात आणि जयघोषात पालखी गावातून काढण्यात आली. ग्रामस्थांनी पारंपरिक पद्धतीने औक्षण करून पालखीचे स्वागत केले. संपूर्ण गावात शिवमय वातावरण निर्माण झाले होते. गडवाटकरी विजय निसाळ यांच्या संकल्पनेतून पै. पंढरीनाथ पाळदे व्यायामशाळेच्या पैलवानांनी सादर केलेल्या थरारक मल्लखांब प्रात्यक्षिकाने उपस्थितांची मने जिंकली. शरीरसामर्थ्य, शिस्त आणि परंपरागत खेळांचे महत्त्व अधोरेखित करणाऱ्या या सादरीकरणामुळे विद्यार्थ्यांमध्ये विशेष प्रेरणा निर्माण झाली. जिजाऊ वंदनेने मुख्य कार्यक्रमास प्रारंभ झाला. प्रास्ताविकात प्रा. उमेश शिंदे यांनी गडवाटच्या स्थापनेपासून आजवरच्या कार्याचा सविस्तर आढावा घेतला. गडकिल्ल्यांचे संवर्धन, इतिहासप्रबोधन, पर्यावरण-जागर आणि संस्कारक्षम उपक्रमांमधून संस्था सातत्याने कार्यरत असल्याचे त्यांनी नमूद केले.

प्रमुख अतिथी बीजमाता ममताबाई भांगरे यांनी गडवाटच्या उपक्रमांचे कौतुक करत बीजसंवर्धन चळवळीचे महत्त्व विशद केले. स्थानिक वाणांचे जतन, पर्यावरणपूरक शेती आणि स्वावलंबन यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, असे त्यांनी आवाहन केले. मुख्य मार्गदर्शक अजयदादा जाधवराव यांनी शिवजयंती साजरी करण्यामागील खरे तत्त्व स्पष्ट केले. सण-उत्सव हे केवळ औपचारिकता नसून त्यामागील इतिहास आणि विचार समजून घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. सत्य इतिहासाचा अभ्यास करून शिवचरित्रातून समाजोद्धार करण्यासाठी युवकांनी पुढे यावे, असे आवाहन त्यांनी केले. कै. दर्शन यांच्या शिवभक्ती, गडकिल्ल्यांवरील प्रेम आणि सामाजिक कार्याची जिद्द ही तरुणांसाठी प्रेरणादायी असल्याचे त्यांनी भावनिक शब्दांत व्यक्त केले.
या कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज, शहाजी महाराज, जिजाऊ आणि संभाजी महाराज यांचे एकत्रित ऐतिहासिक चित्र प्रकाशित करण्यात आले. या चित्रातून स्वराज्याच्या परंपरेची अखंड साखळी उलगडून दाखविण्यात आली. तसेच गडवाट संस्थेच्या अधिकृत वेबसाईटचे उद्घाटन करून डिजिटल माध्यमातून इतिहासप्रबोधनाचे नवे पाऊल टाकण्यात आले. गावातील गुणवंत विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करून त्यांना प्रमाणपत्रे व भेटवस्तू देण्यात आल्या. सर्व विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करून शिक्षणाला प्रोत्साहन देण्यात आले. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते.
डॉ. नितीन बस्ते यांनी काढलेल्या गडकिल्ल्यांच्या ड्रोन छायाचित्रांचे प्रदर्शन कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले. महाराष्ट्राच्या ऐतिहासिक वारशाची भव्यता या छायाचित्रांमधून अधोरेखित झाली. अनेकांनी या प्रदर्शनाचे कौतुक केले. गडवाटकरी श्री योगेश नागरे यांच्या प्रभावी व लयबद्ध सूत्रसंचालनात पार पडलेल्या या सोहळ्यास जनता विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री परदेशी सर, जि.प. शाळेचे मुख्याध्यापक श्री आवारी सर, गडवाट संस्थेचे अध्यक्ष श्री सुहास पवार, ग्रामस्थ, शिक्षक, विद्यार्थी, कै. दर्शन यांचे कुटुंबीय तसेच राज्यभरातील गडवाटकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. इतिहास, संस्कार, समाजप्रबोधन आणि शैक्षणिक प्रोत्साहन यांचा संगम घडवणारा हा शिवजयंती सोहळा गावकऱ्यांसाठी अविस्मरणीय ठरला.