नाशिक (प्रतिनिधी) नाशिक महानगरपालिकेतील कंत्राटी मलेरिया विभागातील कर्मचाऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नांकडे प्रशासनाने अक्षरशः डोळेझाक केल्याचा आरोप रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशनने केला आहे. तब्बल आठ महिन्यांपूर्वी निवेदन देऊनही कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने संतप्त झालेल्या संघटनेने आता कामगार उपआयुक्तांकडे धाव घेतली आहे.
दिनांक ३१ जुलै २०२५ रोजी संघटनेतर्फे सादर करण्यात आलेल्या निवेदनावर प्रशासनाने कोणतीही दखल न घेतल्याने कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. “कामगारांच्या हक्कांबाबत इतकी उदासीनता का?” असा सवाल संघटनेने उपस्थित केला आहे.
कंत्राटी मलेरिया कर्मचाऱ्यांची अद्ययावत सेवाज्येष्ठता यादी प्रसिद्ध करून सेवाज्येष्ठतेनुसार कायम करण्याची मागणी प्राधान्याने करण्यात आली आहे. तसेच, दरवर्षी मिळणाऱ्या गणवेशाच्या नावाखाली निकृष्ट दर्जाचे रेडीमेड टी-शर्ट देऊन कर्मचाऱ्यांची थट्टा केली जात असल्याचा गंभीर आरोपही संघटनेने केला आहे. याऐवजी कापड व शिवणकामाचा खर्च देण्याची स्पष्ट मागणी करण्यात आली आहे.
याशिवाय, प्रत्येक विभागात कर्मचाऱ्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी किमान दोन सुपरवायझर नियुक्त करण्याची मागणीही करण्यात आली आहे. प्रशासनाने तात्काळ या सर्व मागण्यांवर निर्णय न घेतल्यास आंदोलनाचा इशारा संघटनेने दिला आहे.
रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशनचे जिल्हा प्रमुख तथा महानगर प्रमुख संतोष भाऊ वाघ यांच्या नेतृत्वाखाली दिलेल्या या निवेदनावेळी राहुल काळे, विजय डवळे यांच्यासह अनेक पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महानगरपालिकेचा कारभार ढिसाळ! कंत्राटी मलेरिया कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे आठ महिन्यांपासून दुर्लक्ष