नाशिक : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीबाबत साधू-महंतांनी तीव्र नाराजी व्यक्त करत प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. अखिल भारतीय संत समितीच्या बैठकीत कुंभमेळ्याच्या विकासकामांचा आढावा घेताना कामांची संथ गती, नियोजनातील त्रुटी आणि वेळेत कामे पूर्ण होण्याबाबतची अनिश्चितता यावर संत-महंतांनी चिंता व्यक्त केली. कुंभमेळ्यासाठी सुरू असलेल्या कामांकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः लक्ष घालून आवश्यक निर्देश द्यावेत, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
नाशिकमध्ये आयोजित करण्यात आलेल्या अखिल भारतीय संत समितीच्या बैठकीस देशभरातील विविध आखाडे, मठ, पीठे आणि धार्मिक संस्थांचे संत-महंत उपस्थित होते. सिंहस्थ कुंभपर्वाचे नियोजन, प्रशासनाची तयारी तसेच विविध धार्मिक आणि सामाजिक विषयांवर या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.
आखाडा परिषदेचे स्थानिक प्रवक्ते महंत भक्तिचरण दास यांनी सांगितले की, सिंहस्थाच्या तयारीसंदर्भात अखिल भारतीय संत समितीच्या माध्यमातून आखाडे आणि शासन यांच्यात सातत्याने समन्वय साधला जात आहे. मात्र, कुंभमेळ्यासाठी सुरू असलेल्या विकासकामांच्या गतीबाबत संत समाजामध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. दर बारा वर्षांनी होणारा हा जागतिक स्तरावरील धार्मिक सोहळा लक्षात घेता प्रशासनाने अधिक वेगाने कामे पूर्ण करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
बैठकीत संदीप सोनजे यांच्यावर महाराष्ट्र संपर्कप्रमुख म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली. यावेळी महापौर हिमगौरी आडके, उपमहापौर विलास शिंदे, महामंडलेश्वर जनार्दन हरी महाराज, आचार्य सुभेश शर्मन, त्र्यंबकेश्वर आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत महामंडलेश्वर स्वामी शंकरानंद महाराज, मयूरेशशास्त्री दीक्षित, आचार्य तुषार भोसले, पंडित संकेत टोके गुरुजी, महंत अनिकेतशास्त्री देशपांडे महाराज यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
युवा पिढीला संस्कारांची दिशा आवश्यक
संयुक्त राष्ट्रीय महामंत्री तथा मध्य प्रदेशचे राज्यमंत्री महामंडलेश्वर १००८ मनमोहनदास महाराज यांनी युवा पिढीला योग्य संस्कार आणि मार्गदर्शनाची गरज असल्याचे सांगितले. पालकांसह संत-महापुरुषांचे मार्गदर्शन मिळाल्यास भावी पिढी देश आणि धर्मसेवेसाठी प्रेरित होईल. युवकांनी समर्पण भावनेने कार्य केल्यास सनातन संस्कृतीचे संरक्षण आणि देशाच्या प्रगतीला नवे बळ मिळेल, असे त्यांनी प्रतिपादन केले.
