तीन लाखांची लाच स्वीकारताना अभियंत्याला अटक; दुसरा संशयित फरार
नाशिक, दि. ३० (प्रतिनिधी):
रस्ते कामाचे बिल मंजूर करून देण्यासाठी तक्रारदाराकडून तीन लाख रुपयांची लाच स्वीकारताना जिल्हा परिषद बांधकाम विभागातील उपविभागीय अभियंत्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात अटक केली. ही कारवाई सोमवारी सायंकाळी जिल्हा परिषद कार्यालयात करण्यात आली. या प्रकरणातील शाखा अभियंता फरार असून, त्याचा शोध सुरू आहे.
अटक करण्यात आलेल्या अधिकाऱ्याचे नाव विठ्ठल बालाजी पठाडे (वय ५६) असे असून ते चांदवड येथील बांधकाम विभागात कार्यरत आहेत. तर फरार संशयिताचे नाव कृष्णकांत जिभाऊ देवरे (वय २८) असे आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदाराने जिल्हा परिषद बांधकाम विभागामध्ये कंपनी नोंदणीकृत केली होती. संबंधित कंपनीला चांदवड तालुक्यातील रस्त्याच्या डांबरीकरणाचे सुमारे ९० लाख रुपयांचे काम मिळाले होते. या कामासाठी आतापर्यंत तक्रारदारास ४१ लाख रुपये देण्यात आले होते, तर उर्वरित १० लाख रुपयांचे बिल प्रलंबित होते.
हे बिल मंजूर करून देण्यासाठी उपविभागीय अभियंता पठाडे यांनी तीन लाख रुपये, तर शाखा अभियंता देवरे यांनी दोन लाख ६७ हजार रुपयांची लाच मागितल्याची तक्रार करण्यात आली होती. लाच देण्यास नकार देत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवली.
त्यानुसार पथकाने सापळा रचून जिल्हा परिषद कार्यालयात तक्रारदाराकडून तीन लाख रुपये स्वीकारताना पठाडे यांना सायंकाळी ४.४५ वाजता अटक केली. दरम्यान, देवरे यांनी लाचेची रक्कम चांदवड येथील निवासस्थानी स्वीकारण्याचे मान्य केले होते. मात्र, कारवाईची माहिती मिळताच ते फरार झाले असून, त्यांचा शोध सुरू आहे.
या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.