अंबड (प्रतिनिधी): श्री संत मुक्ताई समाधी सोहळ्यानिमित्त श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथून मुक्ताईनगर, खान्देशकडे प्रस्थान करणाऱ्या विश्वगुरु संतश्रेष्ठ श्रीसंत निवृत्तीनाथ महाराजांच्या पादुकांचे अंबड गावात ग्रामस्थांच्या वतीने अत्यंत उत्साहपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात स्वागत करण्यात आले.
पादुकांच्या आगमनावेळी संपूर्ण परिसर ‘ज्ञानोबा-तुकाराम’च्या जयघोषाने दुमदुमून गेला होता. टाळ-मृदुंगाच्या निनादात वारकऱ्यांनी हरिनामाचा गजर करत वातावरण अधिकच आध्यात्मिक केले. ठिकठिकाणी फुलांची उधळण करून पादुकांचे स्वागत करण्यात आले. भाविकांनी पादुकांचे दर्शन घेत भक्तिभाव व्यक्त केला.
यावेळी पालखी सोबत संस्थेचे अध्यक्ष ह.भ.प. राहुल महाराज साळुंके, पुजारी ह.भ.प. जयंत महाराज गोसावी, विश्वस्त नवनाथ महाराज गांगुर्डे, नारायण दादा मुठाळ, चोपदार सागर महाराज दौंड, विणेकरी कृष्णा तात्या रायते महाराज तसेच अनेक कीर्तनकार व वारकरी उपस्थित होते. अंबड ग्रामस्थांच्या वतीने नगरसेवक शरद फडोळ, वामनराव दातीर, तानाजी फडोळ, विष्णु फडोळ, अरुण कर्डेले, भाऊसाहेब दातीर, बंडुपंत दातीर, भास्कर दातीर, संतू फडोळ, संतोष दातीर आदींसह अनेक नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
सर्व मान्यवरांचे यथोचित स्वागत करून ग्रामस्थांनी एकत्रित येत आपल्या भक्तीभावाची प्रचिती दिली. पादुकांचे दर्शन घेताना भाविकांनी समाधान व्यक्त केले तसेच धार्मिक परंपरा जपण्याचा संकल्प केला. कार्यक्रमाच्या शेवटी अंबड ग्रामस्थांच्या वतीने उपस्थितांचे आभार मानण्यात आले.
अंबडमध्ये विश्वगुरु श्रीसंत निवृत्तीनाथ महाराजांच्या पादुकांचे उत्साहात स्वागत
