अंमली पदार्थांविरोधात पोलिसांना नवी ताकद; ‘जॉकी’ची दमदार एंट्री!

हि बातमी पुढील ग्रुपवर पाठवा

चंदीगडमध्ये १० दिवसांचे विशेष प्रशिक्षण पूर्ण; तिसऱ्याच दिवशी कारवाईत अचूक कामगिरी

नाशिक : शहरातील वाढत्या अंमली पदार्थांच्या तस्करीवर आळा घालण्यासाठी नाशिक पोलिस दलाने महत्त्वाचे पाऊल उचलत विशेष प्रशिक्षित श्वान ‘जॉकी’ला सेवेत दाखल केले आहे. चंदीगड येथे १० दिवसांचे खडतर व तांत्रिक प्रशिक्षण पूर्ण करून आलेला जॉकी हा बेल्जियन मॅलिनॉइस जातीचा असून, त्याच्या समावेशामुळे पोलिसांच्या ड्रग्जविरोधी मोहिमेला मोठे बळ मिळणार आहे.

जॉकीची निवड अत्यंत काटेकोर निकषांवर करण्यात आली. बेल्जियन मॅलिनॉइस ही जात तीक्ष्ण घ्राणेंद्रिय, चपळ हालचाली, उच्च सहनशक्ती आणि आदेशांचे अचूक पालन करण्यासाठी ओळखली जाते. प्रशिक्षणादरम्यान जंकला विविध प्रकारच्या अंमली पदार्थांचा वास ओळखणे, लपवून ठेवलेले ड्रग्ज शोधणे, वाहनांची तपासणी करणे, गर्दीच्या ठिकाणी शांतपणे शोधमोहीम राबविणे अशा विविध कौशल्यांचा सराव देण्यात आला. विशेष म्हणजे प्रशिक्षणाच्या तिसऱ्याच दिवशी जंकने प्रात्यक्षिक कारवाईदरम्यान अंमली पदार्थांचा साठा अचूक ओळखून प्रशिक्षकांचे लक्ष वेधले. त्यानंतरच्या चाचण्यांमध्येही त्याने सातत्यपूर्ण अचूकता दाखवली. यामुळे त्याची अंतिम निवड करण्यात आली.

नाशिकमध्ये दाखल झाल्यानंतरही जॉकीचा सराव नियमित सुरू आहे. रोज सकाळी ३ ते ४ तास आणि सायंकाळी १ ते २ तास विशेष प्रशिक्षण दिले जाते. सुमारे ३० मिनिटांची ‘सेंट ड्रिल’, अडथळ्यांवर मात करण्याचे व्यायाम, वेगवेगळ्या वातावरणात शोधमोहीम, तसेच आदेशांनुसार अचूक प्रतिक्रिया देण्याचा सराव यांचा यात समावेश आहे. विविध ठिकाणी नमुने लपवून ठेवून जॉकीकडून त्यांचा शोध घेण्याची चाचणी घेतली जाते. जॉकीसोबत त्याचा हँडलर (प्रशिक्षक) सतत असतो. श्वान आणि हँडलर यांच्यातील समन्वय हा यशाचा मुख्य घटक मानला जातो. आदेश देण्याची पद्धत, संकेत ओळखणे आणि परिस्थितीनुसार निर्णय घेणे या बाबतीत हँडलरला विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे. जॉकीच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवून त्याला योग्य दिशानिर्देश दिले जातात.

शहर व परिसरात अंमली पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी पोलिसांकडून विशेष मोहिमा राबविण्यात येत आहेत. बसस्थानके, रेल्वे स्थानके, हॉटेल्स, संशयित गोदामे आणि शहराबाहेरील भागांमध्ये तपासणीदरम्यान जॉकीची मदत घेतली जाणार आहे. संशयित वाहनांची झडती घेताना आणि गुप्त माहितीच्या आधारे छापे टाकताना जॉकीची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मते, प्रशिक्षित श्वानांच्या मदतीने शोधमोहीम अधिक अचूक, जलद आणि परिणामकारक होते. मानवी डोळ्यांना न दिसणाऱ्या किंवा कौशल्याने लपवून ठेवलेल्या अंमली पदार्थांचा वास जॉकी सहज ओळखू शकतो. त्यामुळे ड्रग्जविरोधातील कारवायांमध्ये यशाचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे.

जॉकीच्या समावेशामुळे नाशिक पोलिस दलाची ताकद वाढली असून, अंमली पदार्थांविरोधातील लढा अधिक प्रभावी करण्यासाठी ही एक महत्त्वाची पायरी ठरणार आहे. शहराला ड्रग्जमुक्त करण्याच्या दिशेने पोलिसांचे प्रयत्न अधिक तीव्र झाले असून, ‘जॉकी’च्या रूपाने त्यांना एक सक्षम सहकारी मिळाला आहे.


हि बातमी पुढील ग्रुपवर पाठवा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *