राणेनगर – सेंट्रल पार्क खड्डे बुजवण्याच्या कामाला अखेर सुरुवात
नवीन नाशिक | प्रतिनिधी
शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे मुख्य रस्ते आणि अंतर्गत रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांची अखेर महापालिका प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. नागरिकांना होणारा त्रास आणि वाहतूक कोंडी लक्षात घेता, महापालिकेकडून शहरातील खड्डे बुजवण्याच्या कामाला युद्धपातळीवर सुरुवात झाली असून खडीचे मिश्रण वापरून हे खड्डे बुजवले जात आहेत.
गेल्या काही दिवसांत झालेल्या सततच्या पावसामुळे अनेक भागांतील डांबरी रस्ते उखडले होते. यामुळे वाहनधारकांना, शालेय विद्यार्थ्यांना रस्त्याने ये – जा करताना मोठी कसरत करावी लागत होती, तर अपघातांचे प्रमाणही वाढले होते.
येथील रस्ता हा मोठी पाईप लाइन टाकण्याकरिता खोदण्यात आला होता परंतु सहा आठ महिने काम होऊन ही या रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली नाही. या पार्श्वभूमीवर नागरिकांमधून तीव्र असंतोष व्यक्त केला जात होता.
विद्यार्थ्यांना खड्ड्यातून वाट काढत कसरत करावी लागत
“मुख्य रस्त्याला जोडणारा हा अंतर्गत रस्ता अतिशय रहदारीचा व वर्दळीचा आहे येथील खोत कामामुळे अनेक दिवसांपासून एकेरी वाहतूक होत असताना ट्रॅफिक जाम होत तर विद्यार्थ्यांना खड्ड्यातून वाट काढत शाळेत जाण्यासाठी कसरत करावी लागत. टास्क फोर्स मोहिमे दरम्यान आम्ही सदरची बाब महापालिका अधिकाऱ्याच्या निदर्शनास आणून दिली; आज प्रत्यक्ष कामाला सुरवात झाल्याने नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे”.
– योगेश भास्कर कातकाडे
सामाजिक कार्यकर्ते